महेंद्रकुमार मोहबंसी : आंदोलनाचा इशाराकुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागासह तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हलक्या प्रतिच्या धानाचा निसवा झालेला आहे. परंतु पाऊस उसंत देत नसल्याने धानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन तत्काळ पिकाचे सर्वेक्षण व पंचनामे करावे, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी यांनी केली आहे. मागील महिन्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन सती नदी तसेच नद्यांच्या काठावर असलेले धान पीक वाहून गेले. अनेक दिवस पीक पुराच्या पाण्यात बुडून राहिल्याने पूर्णत: सडले. जोमात येत असलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला. शिवाय हलक्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा शिवसेना आंदोलन करेल, असा इशारा डॉ. मोहबंसी यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
पिकांचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा
By admin | Published: October 03, 2016 2:14 AM