६० कैद्यांसाठी आरोग्य सुविधा : तीन लाखांच्या भाजीपाल्याचे उत्पादन गडचिरोली : गडचिरोली शहरालगत कोटगल परिसरात असलेल्या खुल्या कारागृहाला रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१५ च्या डिसेंबर महिन्यात गडचिरोली येथे खुले कारागृह सुरू करण्यात आले. या कारागृहात सध्या ६० कैदी आहेत. राज्याच्या विविध कारागृहात शिक्षा भोगून अंतिम टप्प्यात शिक्षा आलेल्या कैद्यांना येथे ठेवण्यात येत आहे. त्यामुळे येथे वयस्कर कैद्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्हा कारागृह सामान्य रूग्णालय व शहरापासून किमान चार ते सहा किमीच्या अंतरावर आहे. अशावेळी कैद्याची प्रकृती बिघडल्यास त्याला रूग्णालयात तत्काळ हलविण्यासाठी सेवा उपलब्ध होत नव्हती. याबाबीचा विचार करून खुल्या कारागृहाकरिता राज्य शासनाने स्वतंत्र रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता आजारी कैद्यास रूग्णालयापर्यंत आणण्यास सोयीचे होणार आहे, अशी माहिती जेलचे प्रभारी अधीक्षक बी. सी. निमगडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. या खुल्या कारागृहात कैद्यांच्या माध्यमातून भाजीपाल्याचे उत्पादनही घेतले जात आहे. हा भाजीपाला शहरात बाजारात विक्रीसाठी आणण्याकरिता ट्रॅक्टर यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. कारागृह परिसरात मत्स्य पालनाच्या दृष्टीकोणातून तलाव तयार झाले असून या वर्षात मत्स्य उत्पादनही होईल, अशी माहिती निमगडे यांनी दिली. आतापर्यंत कारागृह सुरू झाले तेव्हापासून तीन लाख रूपयांच्या भाजीपाल्याची विक्री करण्यात आली. एकूण १७ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
खुल्या कारागृहाला मिळाली रूग्णवाहिका
By admin | Published: March 19, 2017 1:56 AM