लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरी कृती शाखेंतर्गत राबविले जात असलेले रोजगारविषयक कार्यक्रम दुर्गम भागातील युवक- युवतींसाठी आशेचा किरण ठरत आहे. याअंतर्गत विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणखी १८० युवक- युवतींना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी (दि.११) पोलीस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात आणखी १८० युवक- युवतींना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीची संधी देणारे नियुक्तीपत्र जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया (ऑपरेशन), समीर शेख (प्रशासन), सोमय मुंडे (अहेरी उपमुख्यालय) यांच्यासह प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रमुख आशिष इंगळे, रिजनल अकॅडेमिक हेड (हॉस्पिटॅलिटी) भाग्यश्री देशमुख उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि नागरी कृती शाखेचे एपीआय महादेव शेलार आदींनी परिश्रम घेतले.
व्यावसायिक प्रशिक्षणातून बेराेजगारांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाइल, सुरक्षा रक्षक व नर्सिंग असिस्टंट म्हणून आजपर्यंत १६६९ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबतच ब्युटीपार्लर ३५, मत्स्यपालन २५, कुक्कुटपालन ३, शेळीपालन ६७, शिवणकाम ३५, अशा १९७ बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.कुटुंबीयांचे राहणीमान उंचवावे- यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक गोयल यांनी जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर असून, तुमच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. तुमचे मित्र, आप्तस्वकीय यांनादेखील रोजगाराबाबत माहिती देऊन पोलीस दलाने दिलेल्या या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन त्यांनी केले.