आष्टी (गडचिरोली) : आई-वडील अल्प शिक्षित व सामान्य मजूर. पण, लेकीने धनुर्विद्या स्पर्धेत ' निशाणा ' साधून राज्यस्तरीय स्पर्धेत यश प्राप्त केले. मुंबईनंतर आता गुजरातेत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ती सज्ज झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत धनुर्विद्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणाऱ्या या लेकीचे अनुष्का कैलास वाळके असे नाव. चामोर्शी तालुक्याच्या इल्लूर सारख्या छोट्या गावातील या कन्येने क्रीडा क्षेत्रात गडचिरोलीची मान अभिमानाने उंचावली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहर तथा जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १८ तेे २० नोव्हेंबर दरम्यान कामगार कल्याण मंडळ, मुंबई यांच्या भव्य पटांगणावर १४ वर्षे वयोगट मुला / मुलींच्या धनुर्विद्या स्पर्धा पार पडल्या. आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेल्या अनुष्का वाळके हिने भारतीय धनुर्विद्या खेळ प्रकारात आपले वर्चस्व प्रस्थापित करून राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. आष्टीतून अनुष्का वाळके व गणेश जागरवार हे दोघे राज्य स्पर्धेत सहभागी झाले होते. गणेश जागरवारनेही इंडियन खेळ प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.
दरम्यान, अनुष्का वाळके हिने अचूकपणे निशाणा साधत राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. आता ती गुजरातेतील नाडियार येथे १० ते १५ डिसेंबर २०२३ मध्ये होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपले कसब दाखवणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, सहायक अधिकारी घनश्याम वरारकर, तालुका क्रीडा अधिकारी नाजूक उईके आदींनी अनुष्काचे कौतुक केले आहे.
शाळेकडूनही मिळाले प्रोत्साहन
आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये अनुष्का वाळकेने धनुर्विद्येची कला अवगत केली. क्रीडाशिक्षक सुशील औसरमल, प्रा.डॉ. श्याम कोरडे, रोशन सोळंके, कौमुदी श्रीरामवार, नीतेश डोके यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. वन वैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष बबलू हकीम, शाहीन हकीम, प्राचार्य शैलेंद्र खराती, संजय फुलझेले, पर्यवेक्षक के.जी. बैस, राजूभाऊ पोटवार यांनी तिचे काैतुक केले आहे.
आई-वडिलांचा आनंद गगनाला
अनुष्का वाळके हिची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याची बातमी कानावर पडताच मजूर आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दोघेही लेकीच्या यशाने भारावून गेले.
मी पाचवीपासून महात्मा फुले विद्यालयात आहे. या विद्यालयातच मला धनुर्विद्या खेळाची आवड निर्माण झाली. यासाठी क्रीडाशिक्षक व इतर प्राध्यापकांनीही खूप प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. आई-वडिलांचेही सहकार्य लाभले. त्यामुळेच राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचू शकले. एक ना एक दिवस देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची इच्छा आहे.
- अनुष्का वाळके, धनुर्विद्या खेळाडू