कुरूड : माती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती नमुन्याचे परीक्षण करून घ्यावे. त्यानुसार खत किंवा अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम यांनी केले.
देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा येथे जमीन आराेग्यपत्रिका कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या सभेत ते मार्गदर्शन करीत हाेते. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रम कोंढाळा येथील ईश्वर राऊत यांच्या शेतावर पार पडला. यावेळी मार्गदर्शक म्हणून मृद संधारण व चाचणी अधिकारी ग. ब. बादाडे, मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम, कृषी पर्यवेक्षक सी. जी. ताडपल्लीवार उपस्थित हाेते.
याप्रसंगी माती नमुना काढण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविण्यात आले. जी. बी. बादाडे यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पना विशद केली. उपलब्ध परिस्थितीनुसार, पिकांची निवड करून कमी पाण्यात, कमी खर्चात पिकांचा पेरा वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी मातीनमुने खत टाकलेली जागा, खाेलगट भाग, पाणथळ जागा, झाडाखालील जमीन, बांधाजवळील जागा, ढिगाऱ्याजवळील जागा आदी ठिकाणांहून नमुने घेऊ नये, असे सांगितले. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे माती नमुने घेण्याची गरज नाही. फळ पिकाकरिता व सर्वसाधारण पिकांकरिता वेगवेगळे नमुने घ्यावे. साधारणत: तीन ते चार वर्षांनंतर पुन्हा माती परीक्षण करावे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी गेडाम यांनी केले.
सूत्रसंचालन शेतकरी नीतेश पाटील तर कृषी सहायक याेगेश बाेरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी नागोराव ऊके, भास्कर पत्रे, हिरालाल राऊत, राजेंद्र शेंडे, भाऊराव दोनाडकर, प्रभाकर चौधरी, प्रदीप तुपट, योगराज पत्रे, ईश्वर दुपारे, एकनाथ पत्रे, ताराचंद मेश्राम, नरेश ढोंगे, गिरीश भजनकर, अक्षय पुराम, प्रशीक मेश्राम व महिला शेतकरी उपस्थित होते.