गडचिराेली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिराेली जिल्ह्यात वृद्ध कलावंतांची अशासकीय समिती कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील २५० वृद्ध कलावंत मानधनापासून प्रतीक्षेत आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने गडचिराेली जिल्ह्यात वृद्ध कलावंतांची अशासकीय समिती नेमावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांना पाठविलेल्या निवेदनात दशमुखे यांनी म्हटले आहे की, वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे पाठविले जातात. गेल्या तीन वर्षांपासून २५० वृद्ध कलावंतांचे मानधनाचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे तयार आहेत. परंतु अशासकीय समितीची निवड न झाल्याने हे प्रस्ताव तसेच थंडबस्त्यात पडून आहेत.
गडचिराेली जिल्हा हा झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचा जिल्हा आहे. येथे दंडार व लाेककला सादर करणारे अनेक कलावंत आहे. या कलावंतांना मानधनाच्या माध्यमातून दिलासा देण्याकरिता समिती नेमावी, असे म्हटले आहे.