गडचिरोली : जिल्हा परिषदेमध्ये एप्रिल २०१३ ते २८ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत शिक्षक संवर्गातील ११ प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे बदलीच्या संदर्भाने पाठविण्यात आले होते. यातील १० प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात बनावट बदल्या करणार्या टोळीने आयुक्ताच्या मंजुरीची कुठलीही फाईल न टाकता ८७ शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्या बदल्या केल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकाच्या बदल्या करण्यापूर्वी विभागीय आयुक्तांची मंजुरी न मिळालेल्या सर्व बदल्या रद्द करून नियमबाह्य बदली मिळविणार्या शिक्षकांना मुळ जागेवर पाठवावे, अशी मागणी शिक्षकांच्या विविध संघटनांनी केली आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या बनावट बदलीचा घोटाळा लोकमतने उजेडात आणल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन व जि. प. पदाधिकार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. माहिती अधिकाराअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १४ मे २०१४ ला प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१३ ते २८ फेब्रुवारी २०१४ या कालावधीत जिल्हा परिषदेकडून ११ बदली प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १० प्रस्तावांना मंजुरी प्रदान करण्यात आली. यामध्ये एम.बी. मेश्राम मंजेगाव (चामोर्शी) येथून मरेगाव गडचिरोली, आर. के. जांभूळकर पेठ (चामोर्शी) कुरूड (देसाईगंज), गीता भरत मानकर नांदळी (कोरची) येथून मुरखळा गडचिरोली, डब्ल्यू. टी. सातपुते मोरावाही (एटापल्ली) येथून मुरखळा माल (चामोर्शी), आशा कासेवार अनखोडा (चामोर्शी) व सुशिला ठाकरे ठाणेगाव (आरमोरी) आपसी बदली, केंद्रप्रमुख येलेश्वर कोमरेवार गट्टा (एटापल्ली) येथून गुरवळा (गडचिरोली), ए. वाय. कोकोडे सिरोंचा येथून धानोरा, पी. व्ही. खेवले वानरचुआ (आरमोरी) व आर. एस. शिवणकर बेलगाव (गडचिरोली) आपसी बदली, मुनवर बानो शेख भामरागड येथून गडचिरोली या बदली प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून के. जी. विश्वास केंद्रप्रमुख नारगुंडा (भामरागड) यांचा गणपूर (चामोर्शी) चा बदली प्रस्ताव आयुक्तांनी फेटाळून लावला आहे. १८ एप्रिल २०१३ च्या बदली आदेशात ३१ मे नंतर कोणत्याही कर्मचार्याच्या बदल्या करतांना विभागीय आयुक्ताची पूर्वमान्यता घेतल्याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बदली करू नये असे नमुद आहे. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या अधिनस्त टोळीने जवळजवळ ८७ शिक्षकांच्या बदल्या बनावटी बदली आदेशावर (सह्या स्कॅन करून, पदाधिकार्यांचे शिफारसी पत्र बदल्यांसाठी घेऊन) बदल्या केल्या. या बदली आदेशावर विभागीय आयुक्तांच्या मंजुरीस अधिन राहून असा शेराही नमुद करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व बदल्या विभागीय आयुक्तांची मान्यता नसल्याने रद्द होणार्या आहे. यांचे आदेशही नियमबाह्य व बनावटी आहेत. त्यामुळे सर्व बदल्या रद्द करून सर्व शिक्षकांना त्यांच्या पूर्वीच्या जागेवर नियुक्तीला पाठविणे आवश्यक आहे. या बदल्यांमुळे गेल्या वर्षभरापासून दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांचे पदही रिक्त आहे. अनेक ठिकाणी शिक्षकाअभावी शाळा उघडलेल्या नाहीत. एटापल्ली तालुक्यातून अशी तक्रारही मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे करण्यात आली होती. यंदा पुन्हा जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी गतवेळी झालेल्या ८७ बदल्या रद्द करून या सर्व शिक्षकांना त्यांच्या मुळ ठिकाणी पाठवावे व त्यानंतर बदली प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मंजुरी १० ला, केल्या ८५ बदल्या
By admin | Published: May 18, 2014 11:35 PM