वन कायद्याची अडचण दूर करण्यात अपयश : १० वर्षांपूर्वी निश्चित केली जागागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय देसाईगंज येथे सुरू करण्याच्या उद्देशाने १५० एकर जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र महसूल, वन प्रशासनाच्या कचाट्यात या जागेचा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. कुरखेडा मार्गावर असलेल्या पशुप्रजनन प्रक्षेत्राच्या भागात राज्य राखीव पोलीस दलाच्या मुख्यालयासाठी जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. ही जागा गृहविभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत महसूल व वन विभागाला आदेश देण्यात आले होते. परंतु तब्बल १० वर्षांपासून हे काम प्रलंबित आहे. गोंदिया येथे सदर मुख्यालय हलविण्यात आले. १३ जुलै २०१५ ला शासन निर्णयानुसार देसाईगंज येथील पशुप्रजनन प्रक्षेत्रातील गट क्र २, ३ (अ) व ३ (ब) मधील ७० एकर जमीन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ च्या नागपूर मुख्यालयासाठी गृहविभागाला हस्तांतरित करण्याबाबत महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात आली, परंतु या मुख्यालयाकरिता ७० एकर जागा अपुरी पडत असल्याने पुन्हा नव्याने ८० एकर जागेची आवश्यकता होती. त्यामुळे उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे पशुप्रजनन प्रक्षेत्र देसाईगंज येथील गट क्र. २, ३ (अ), ३ (ब) मधील अतिरिक्त ८० एकर जागा गृहविभागास हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव महसूल व वन विभागाकडे पाठविण्यात आला. महसूल व वन विभागाने ही १५० एकर जागा गडचिरोली यांच्याकडे वर्ग करण्याची कार्यवाही करावी, असेही शासन निर्णयात नमूद आहे.दरम्यान, राज्य शासनाच्या गृह विभागाने वन विभागाच्या एकूण १५० एकर प्रत्यार्पित जमिनीचा ‘नेट प्रेझेंट व्हॅल्यू’ (एनपीव्ही) रक्कम अदा केली असून ही जमीन वन विभागाची असल्याने वन संवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत निविनीकरण करणे आवश्यक आहे. गृहविभागास हस्तांतरीत केलेल्या एकूण १५० एकर जमिनींचे वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत निविनीकरण करण्याची कार्यवाही केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण विभागाकडून घेण्याचे सांगण्यात आले. जागेचा ताबा गृहविभागाने स्थानिक पशुप्रजनन प्रक्षेत्र विभागाकडून विहीत अटी व शर्तीनुसार घ्यावा, असेही आदेशात म्हटले आहे. याबाबत राज्य राखीव पोलीस दलाचे कार्यालय स्थापन करण्याबाबत संपूर्ण कार्यवाही झाल्याचे स्पष्ट होते. पशुप्रजनन क्षेत्रातील निर्धारित जागेवर राज्य राखीव पोलीस बल क्रमांक १३ यांनी केवळ फलक लावून ठेवला असून मुख्यालयाच्या बांधकामाला सुरुवात न केल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)
एसआरपीमुख्यालयासाठी जागेचा तिढा कायम
By admin | Published: October 17, 2015 2:05 AM