आरमोरी नगर परिषदेत एकूण ७० सफाई कामगार आपल्या कंत्राटी कर्मचारी म्हणून मागील ३ ते ४ वर्षापासून कार्यरत आहेत. किमान वेतन प्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे, सफाई कामगारांचे वेतन बॅंकेतून अदा करण्यात यावे याबाबत संबंधित कंत्राटदारांना विनंती केली. परंतु संबंधित कंत्राटदार या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तरी संबंधित कंत्राटदारास मुख्याधिकाऱ्यांनी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन बँकेतून अदा करण्याचे आदेश द्यावे असे निवेदनात म्हटले आहे. शनिवारला प्रत्यक्ष कंत्राटी सफाई कामगारांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, आरमोरी नगर परिषदेच्या वतीने अमरावती येथील एका कंत्राटदाराला १ कोटी १८ लाख ५० हजारांचे कंत्राट जानेवारी २०२१ मध्ये मिळाले. याबाबत सदर कंत्राटदाराने नगर परिषदेने दिलेल्या अटी व शर्तीबाबत करारनामा लिहून दिला आहे. त्यात सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल असे नमूद केले आहे.परंतु सफाई कामगारांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने न होता, सफाई कर्मचाऱ्यांना घरी बोलावून त्यांना पैसे काढण्याच्या विड्राॅलवर सही मारायला लावून त्यांना कमी वेतन प्रदान केल्या जातात. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांला ५०७/-रुपये प्रतिदिन देण्याचे आदेश असताना संबंधीत कंत्राटदार मात्र त्यांना फक्त २३०/- रुपये प्रतिदिन काम करण्याचे देतो. एवढेच नव्हे तर सफाई कामगार हे महिनाभर काम करूनही त्यांना फक्त २६ दिवसांचे वेतन दिल्या जाते. त्यामुळे संबंधित कंत्राटदार सफाई कामगारांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. याबाबतचे निवेदन देऊन समस्या साेडविण्याची मागणी केली आहे. नियमानुसार मजुरी न दिल्यास आंदाेलन चालूच राहील, असा इशारा दिला आहे.
निवेदन देताना वर्षा खेडकर, वर्षा गुरनुले, वनिता बोरकर, अविनाश उके, भाऊराव दिवटे, हरिदास गराडे, साधना गजभिये, रमेश भोयर, साधना गजभिये, गुणवंत रामटेके, उमेश रामटेके, गजानन सावसाकडे, तुकाराम बावणे, उमेश खोब्रागडे, राजू मंगरे, विनायक खापरे, संजय खोब्रगडे दशरथ दुमाने, चिंतामण खोब्रागडे, पुंडलिक रामटेके, महादेव कुकडकर, मारोती मुंगीकोल्हे, प्रमोद गिरडकर, राहुल काळबांधे, राजू नागदेवें, रेखा कांबळे, त्रिशला गोवर्धन,ज्योती मोगरे, कुसुम मेश्राम, गीता शेडमाके, सुरेख मेश्राम, अलका भोयर, राजेश मून, संगीता कांबळे, मंगल मोटघरे, सचिन बोडलकर, कल्पना साळवे, मंगला मोटघरे, मारोती कोल्हे, आकाश कोल्हे, नितीन मेश्वराम, प्रज्ञा खरकाटे, सरिता सोनटक्के व इतर कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाॅक्स
काय म्हणतात ..... सभापती व अभियंता
न.प. आरोग्य सभापती भारत बावनथडे यांचेशी चर्चा केली असता, सदर सफाई कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे निवेदन दिले नाही. असे असले तरी संबंधित कंत्राटदार व सफाई कर्मचारी यांना एकत्रित बोलावून त्यावर निश्चितच चर्चा करून सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले.
नगर परिषदेचे अभियंता गोरखेडे यांचेशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, सदर कंत्राटदाराने करारनामा करून देताना सफाई कामगारांचे वेतन बँक खात्यातून होईल असे लिहून दिले आहे. इस्टीमेटनुसार एकूण ७० सफाई कर्मचारी आहेत.जोपर्यंत कंत्राटदार सफाई कामगारांचे वेतन बँक खात्यातून करणार. नाही तोपर्यंत आपण बिल काढणार नसल्याचे नगर परिषदेचे अभियंता गोरखेडे यांनी सांगितले.