महेंद्र रामटेके ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरातून गोळा केलेल्या सुका व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या टाकावू कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प आरमोरी नगर परिषदेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे.आरमोरी-वडसा मार्गावरील आयटीआय इमारतीच्या समोरील जवळपास चार एकर जागेत नगर परिषदेने डम्पिंग यार्ड तयार केले आहे. या डम्पिंग यार्डमध्ये जवळपास दोन टन कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून नगर परिषद प्रशासन जमा करीत आहेत. जमा झालेल्या कचऱ्याचे सुका कचरा व ओला कचरा असे वर्गीकरण करून हा कचरा वेगवेगळा केला जात आहे. सदर कचऱ्याचे योग्य नियोजन व्हावे व त्याची योग्य विल्हेवाट लागावी, यासाठी जमा झालेल्या ओल्या कचºयापासून कंपोष्ट खत तयार करण्याचा प्रकल्प आरमोरी नगर परिषदेने हाती घेतला आहे.आरमोरी शहरातील प्रत्येक वार्डात नगर परिषदेच्या १३ घंटागाड्या दररोज कचरा गोळा करण्यासाठी फिरत असतात. तसेच २३ महिला सकाळी व सायंकाळी रस्त्यावर झाडू मारून साफसफाई करतात. दररोज ओल्या कचऱ्यापेक्षा सुका कचरा जास्त गोळा होतो. सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून उपयोगी वस्तू विकल्या जाणार आहे व इतर सुक्या कचºयाची योग्य विल्हेवाट लावली जाणार आहे.सडका भाजीपाला, शिळे अन्न व इतर ओल्या कचऱ्यापासून प्रायोगिक तत्वावर नगर परिषदेने खत निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यात या प्रकल्पाला अधिक गती देण्याचा व तयार होणाºया कंपोष्ट खताची पॅकींग व ब्रँडींग करून तसेच त्याला लेबल लावून मार्केटमध्ये विकल्या जाणार आहे. ‘कचरामुक्त व आरोग्ययुक्त आरमोरी’ हे ब्रिदवाक्य समोर ठेवून आरमोरी नगरवासीयांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही, याची काळजी नगर परिषद घेणार आहे.आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, स्वच्छता व आरोग्य सभापती भारत बावणथडे, मुख्याधिकारी संतोष चौधरी, न.प. अभियंते बंडावार, गोरखेडे यांनी वडसा मार्गावरील डम्पिंग यार्डला नुकतीच भेट देऊन सदर प्रकल्पाचा आढावा घेतला व या कामाची पाहणी केली. भविष्यात सुध्दा कचऱ्यापासून काही तरी प्रकल्प सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लागणार आहे.तपासणीनंतरच शेतकऱ्यांना खत देणारडम्पिंग यार्डमध्ये ८ बाय १० फूट आकाराचे व ७ फुट खोल असे एकूण ९ खड्डे नगर परिषदेने तयार केले आहे. या खड्ड्यात ओला कचरा टाकून त्यावर प्रक्रिया केली जाते. टाकलेल्या ओल्या कचऱ्यावर बायोकल्चर फवारणी करून टाकावू ओल्या कचऱ्याचा उपयोग नगर परिषदेने कंपोष्ट खत तयार करण्यासाठी केला आहे. सदर खत तयार होण्यासाठी जवळपास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर सदर खत वापरण्यायोग्य आहे की नाही, यासाठी खताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहे. लॅब टेस्टिंग झाल्यानंतरच सदर कंपोष्ट खत शेतकऱ्यांसाठी विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.स्वच्छ व सुंदर आरमोरी शहर निर्माण करण्यासाठी नगर परिषदेचे प्रयत्न सुरू आहे. शहरवासीयांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. आरमोरी नगरातून १०० टक्के कचरा गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी शहरातील प्रत्येक वार्डात घंटा गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ओला व सुक्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या कचराकुंड्या लावण्यात येणार आहे. जमा झालेल्या कचºयाचे योग्य नियोजन करून त्याचा उपयोग केला जाणार आहे.- हैदर पंजवानी, उपाध्यक्ष, नगर परिषद आरमोरी
आरमोरीत कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:50 PM
आरमोरी शहरातून गोळा केलेल्या सुका व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या टाकावू कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प आरमोरी नगर परिषदेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. आरमोरी-वडसा मार्गावरील आयटीआय इमारतीच्या समोरील जवळपास चार एकर जागेत नगर परिषदेने डम्पिंग यार्ड तयार केले आहे.
ठळक मुद्देनगरपरिषदेचा पुढाकार : जमा होणाऱ्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया