नाल्याही तुंबल्या : नगर परिषदेने लक्ष देण्याची मागणीगडचिरोली : आरमोरी मार्गावरील वन विभागाचा नाका ते फुले वार्डाकडे निघणाऱ्या आरमोरी बायपास मार्गाची दुरवस्था झाली आहे. या मार्गाच्या दुरूस्तीकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष झाले असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यामध्ये नालीचे पाणी साचले आहे. फुले वार्ड व गांधी वार्डातील अनेक नागरिक शेतात तसेच आरमोरी मार्गाकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. अडपल्ली, गोगाव, खरपुंडी येथीलही नागरिक बाजारात येण्यासाठी याच मार्गाने ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच वर्दळ राहते. मार्गाच्या दोन्ही बाजुला घरे तयारी झाली आहेत. सदर नागरिकसुध्दा याच मार्गाने ये-जा करतात. मात्र नगर परिषदेने या मार्गाची मागील पाच वर्षांपासून दुरूस्ती केली नाही. पाच वर्षांपूर्वी या मार्गाचे खडीकरण केले होते. त्यानंतर मात्र दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले. परिणामी प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. मात्र नगर परिषद निधी नसल्याचे कारण पुढे करीत या मार्गाची दुरूस्ती रखडविली आहे. सदर मार्गसुध्दा शहरातीलच एक मार्ग असल्याने या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
आरमोरी बायपास मार्ग खड्ड्यात
By admin | Published: December 28, 2015 1:40 AM