आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, तसेच खुल्या जागांवर नागरिकांनी अतिक्रमण करून पक्के बांधकाम बांधले आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. मात्र, अतिक्रमण काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
चामोर्शी तालुक्यातही गावांना रस्त्याची प्रतीक्षा
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील वेंगनूर येथे अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. प्रशासनाने याची दखल घ्यावी. पांदण रस्त्याचेही खडीकरण न झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास हाेताे.
खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरून जेप्रा, दिभना, अमिर्झा, चांभार्डा, आंबेशिवणी, भिकारमौशी, राजगाटा, उसेगाव आदी गावांतील शेकडो नागरिक ये-जा करतात. मार्ग अरुंद असल्याने वाहतुकीस अडथळा होतो.
जिल्ह्यात गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा
एटापल्ली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यांतील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारात वाढ होत आहे. ग्रामीण भागातील नागरिक रस्त्याच्या मुख्य मार्गावरच उघड्यावर शौचास बसत आहेत.
वसतिगृह निर्माण करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.
मोकाट डुकरांचा हैदोस
गडचिरोली : गोकूलनगर लगतच्या आशीर्वादनगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकराच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे आरोग्य धोक्यात आहे.
सिंचन विहिरीऐवजी बोअर खोदून द्या
रांगी : शासनाच्या मार्फत बहुतांश शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदून देण्यात आल्या आहेत. मात्र, या विहिरींच्या पाण्याची पातळी खोलात गेली आहे. त्यामुळे पाणी पुरत नाही. या विहिरींना बोअर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र, शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळ खात आहे. काही शाळांना वीज पुरवठा होता. मात्र, वीज बिल भरले नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
मनोऱ्याची रेंज वाढवा
धानोरा : तालुक्यातील मोहली येथे बीएसएनएलचा मनोरा आहे. परंतु, त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दुधमाळा, गिरोला, गोडलवाही आदी ठिकाणी भ्रमणध्वनीचे मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पट्ट्यांसाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. अटीमुळे अनेक दावे प्रलंबित आहेत.
सिरकाेंडाजवळ पूल बांधा
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामिडी तोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे पुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
वयोवृद्धांना पेन्शन द्या
चामोर्शी : जिल्ह्यात वयोवृद्ध ओबीसी शेतकरी व शेतमजुरांची संख्या मोठी असून, त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षांनंतर प्रति महिना ३ हजार रुपये वृद्धापकालीन अर्थसाहाय्य पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
तलावात अतिक्रमण
धानोरा : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलसाठवणूक क्षमता घटली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अतिक्रमणामुळे तलाव नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जड वाहतूक जाेेमात
आलापल्ली : छत्तीसगड, आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी वाहतूक केल्या जाते. त्यामुळे शहरातील व जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. जड वाहतुकीमुळे अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कारवाईची गरज आहे.
कोरचीत मूलभूत समस्या
कोरची : तालुक्यात सिंचन, रस्ते, वीज, पाणी आदींसह अनेक समस्या ऐरणीवर आहेत. त्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. या तालुक्यात आरोग्याची समस्या गंभीर आहे. शिवाय तालुक्यातील विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. शाळांच्याही समस्या कायम आहेत. या समस्या साेडविण्याची मागणी हाेत आहे.