जिल्ह्यातील गडचिरोली आणि वडसा नंतर आरमोरी ही तिसरी नगरपरिषद आहे. गडचिरोली आणि वडसा नगरपरिषदेला सद्यस्थितीत अग्निशमन वाहन उपलब्ध आहे मात्र आरमोरी नगरपरिषदेला नाही. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने आरमोरी शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात आगीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . एखाद्या ठिकाणी आग लागली तर ती तात्काळ विझविण्यासाठी व आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्यास्थितीत आरमोरीत कुठलीच व्यवस्था नाही. त्यामुळे आग लागली तर वडसा किंवा गडचिरोली वरून अग्निशमन वाहन बोलवावे लागते. अशावेळी अग्निशमन वाहन आगीच्या ठिकाणी पोहचेपर्यन्त खुप वेळ लागत असल्याने अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचेपर्यंत सर्व जळून खाक होऊ शकते. अशा परिस्थितीत बाहेरील अग्निशमन वाहनाचा मुळीच उपयोग होत नाही. त्यामुळे आपदकालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन वाहनाजवळ उपलब्ध असणे गरजेचे असते.
आरमोरी नगरपरिषदमध्ये निवडणूक होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटत आहे. पदाधिकारी ही सत्तारूढ झाले मात्र अत्यावशक सेवा असलेली अग्निशमन यंत्रणा नगरपरिषदकडे आजच्या स्थितीत उपलब्ध नाही त्यामुळे आगीच्या घटना शहरात घडल्यास नगरपरिषद प्रशासन आग विझविणार कसा असा प्रश्न आरमोरीकर जनतेला पडत आहे. अग्निशमन वाहन खरेदी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन पुढाकार घेणार का? की एखाद्या वेळेस मोठी आग लागल्यावर नगरपरिषद प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्नही आरमोरीकर जनतेला पडत आहे.
(कोट)
आरमोरी नगरपरिषद ला शासनाकडून अग्निशमन वाहन मंजूर झाले आहे .अग्निशमन वाहन खरेदीची निविदा प्रक्रिया ही राबविण्यात आली आहे. त्यामुळे आरमोरीकरांच्या सेवेत लवकरच अग्निशमन वाहन दाखल होणार आहे.
- हैदरभाई पंजवानी़
उपाध्यक्ष नगर परिषद आरमोरी