गडचिरोली : देसाईगंज पोलिसांनी ११ सप्टेंबर राेजी साेमवारला एका मेटॅडोरसह सुमारे ३३ लाख ५० हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. याप्रकरणी आशिष अशोक मुळे (३०) रा. खरबी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर व अतुल देविदास सिंधीमेश्राम (२९), रा. भवानी वार्ड, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, सुगंधित तंबाखूची वाहतूक करण्यात येत असल्याची गाेपनिय माहिती मिळाल्यानंतर देसाईगंज पोलिसांनी साेमवारला पाळत ठेवून समोरुन येणारे मेटॅडोर वाहन अडविले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात प्लॉस्टिक पिशव्यांमध्ये भरलेला सुगंधित तंबाखू आढळून आला. वाहन आणि सुगंधित तंबाखूची किंमत ३३ लाख ५० हजार ४८० रुपये एवढी आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करुन आशिष मुळे व अतुल सिंधी मेश्राम यांना अटक केली.
जिल्हा पाेलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंजचे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, अमलदार दिनेश राऊत, नरेश कुमोटी, विलेश ढोके, संतोष सराटे यांनी ही कारवाई केली.