मदत : हेल्पिंग हॅन्डस् व उडाण फाऊंडेशनचा पुढाकार अहेरी : अतिशय गरीब परिस्थिती असल्याने नातेवाईकाचा मृतदेह नेण्यासाठी आलाम कुटुंबीयांना अडचण आली. नागेपल्ली येथून सूरजागड येथे मृतदेह कसा न्यायचा, हा प्रश्न मृतकांच्या आलाम कुटुंबीयांना पडला. दरम्यान याबाबीची माहिती कळताच उडाण फाऊंडेशन व हेल्पिंग हॅन्डस्च्या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी लागलीच पोहचून मृतकाच्या कुटुंबीयांना ३ हजार ५०० रूपये रोख देऊन मृतदेह सूरजागड येथे नेण्यासाठी स्वर्गरथाची व्यवस्था करून दिली. सूरजागड येथील रहिवासी पोद्दी रामसू आलाम यांचा मंगळवारी पहाटेच्या सुमारास नागेपल्ली येथे मृत्यू झाला. मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने पैशाअभावी सूरजागड येथे स्वंगावी मृतदेह कसा न्यायचा, असा प्रश्न आलाम कुटुंबीयांसमोर निर्माण झाला. याबाबतची माहिती उडाण फाऊंडेशनचे आलापल्ली येथील कार्यकर्ते संतोष मंथनवार व रोमीत तोंबर्लावार यांना मिळाली. त्यांनी हेल्पिंग हॅन्ड्स अहेरीला मृतदेह नेण्यासाठी स्वर्गरथाच्या व्यवस्थेकरिता संपर्क केला. त्यानंतर हेल्पिंग हॅन्ड्स व एकता मंडळ अहेरीतर्फे स्वर्गरथाची व्यवस्था आलाम कुटुंबीयांना करून देण्यात आली. महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट नागेपल्लीचे संचालक अशोक रापेल्लीवार यांनी ३ हजार ५०० रूपयांची मदत केली. उमेश गुप्ता, प्रकाश चुनारकर, सतीश आत्राम यांच्या मदतीने मृतदेह सूरजागड येथे पाठविण्यात आला. (प्रतिनिधी)
मृतदेह नेण्यासाठी स्वर्गरथाची केली व्यवस्था
By admin | Published: April 19, 2017 2:14 AM