सरकारकडून दिशाभूल : भारिप, बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांची मागणीगडचिरोली : पिपल्स इम्प्रुव्हमेंटचे तोतया सल्लागार रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी २५ जूनच्या रात्री २ वाजताच्या सुमारास मुंबई दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले डॉ. आंबेडकर भवन बुल्डोजरने उद्ध्वस्त केले. या घटनेचा निषेध करीत आंबेडकर भवन तोडणाऱ्या रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. पत्र परिषदेला भारिपचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, बाळू टेंभुर्णे, डी. बी. मेश्राम, सीताराम टेंभुर्णे, जगन जांभुळकर, तुळशीराम सहारे, मिलींद अंबादे, माला भजगवळी, किशोर फुलझेले आदी उपस्थित होते. गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी मुंबई दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस, महत्त्वपूर्ण दस्तावेज व अन्य साहित्यांचे नुकसान केले. यामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या, असेही राऊत यावेळी म्हणाले. गायकवाड यांना माहितीआयुक्त पदावरून हटवावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. (स्थानिक प्रतिनिधी)
आंबेडकर भवन तोडणाऱ्यांना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2016 1:35 AM