देसाईगंज तालुक्याला तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. याशिवाय छत्तीसगडकडे जाणारा राज्य महामार्ग शहरातून जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी असते. त्यातच ट्रान्सपोर्ट व्यवसाय रस्त्यावरून केला जातो. रस्त्यालगत वाहने उभी करून माल उतरविला जातो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यापूर्वी या भागात मोठे अपघात झाले आहेत. हुतात्मा स्मारक ते सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह या दरम्यान मुख्य महामार्गावर दुसऱ्या ठिकाणावरून बुक केलेला माल ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या माध्यमातून शहरात येत असतो. दर आठवड्यात माल भरलेल्या गाड्या व्यावसायिक शहरांच्या मुख्य महामार्गावरच उतरवितात. त्यामुळे हा माल उतरविल्यानंतर रस्त्यावरच ठेवला जातो. तसेच ज्या व्यक्तीच्या मालकीचा माल असेल त्याच्या दुकानापर्यंत पोहोचविण्यासाठी हातगाड्या, टेम्पो, मालवाहू वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते.
बाॅक्स
स्वतंत्र डेपाेची आवश्यकता
देसाईगंज शहरात अनेक माल पुरवठा करणारे व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्यांना स्वतंत्र डेपो तयार करून आणलेला माल वितरित करणे आवश्यक आहे. परंतु, अशा प्रकारचे वितरण न करता रस्त्यावरच मालवाहतूक करणारे ट्रक उभे ठेवून माल उतरविता जातो. या मालाची उचल करण्यासही बराच वेळ लागतो. विशेष म्हणजे शाळा, कॉलेज, कार्यालये, दवाखाने याच मार्गावर आहेत. यापूर्वी येथे अपघात घडले आहेत. त्यामुळे स्वतंत्र डेपाे निर्माण करण्याची गरज आहे.