लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात गत काही वर्षांत राज्य व राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाल्याने आंतरराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली. यामुळे या महामार्गावर ढाब्यांचीही संख्या वाढली. जिल्ह्याच्या महामार्गांवर जेवढे वाहनथांबे आहेत. तेवढेच ढाबे निर्माण झालेले आहेत. या ढाबेचालकांकडे परवाने आहेत की नाही, हा मात्र चौकशीचा विषय आहे. जिल्ह्यात राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आहे. काही ठिकाणापर्यंत महामार्गाचे कामही पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या ढाब्यांची संख्या पुन्हा वाढू शकते.
गडचिरोली- अहेरी- सिरोंचा मार्गावर सर्वाधिक ढाबे जिल्ह्यात गडचिरोली अहेरी सिरोंचा हा सर्वांत लांबीचा मार्ग आहे. या मार्गावर सर्वाधिक ढाबे आहे. जवळपास ३० हून अधिक ढाबे या मार्गावर आहेत.
पाच वर्षांत तीन ढाब्यांवर कारवाई गत पाच वर्षांत कोरची तालुक्यातील दोन ढाब्यांवर तर कुरखेडा तालुक्यातील एका ढाब्यावर पोलिसांनी दारू विक्रीच्या संशयावरून धाड टाकून कारवाई केली. येथून दारूसाठा जप्त करण्यात आलेला होता.
ढाब्यासाठी परवानगी कोणाकोणाची हवी? ढाब्यासाठी एफएसएसएआय परवाना, खाण्याच्या घराचा परवाना, आरोग्य व्यापार परवाना, दारू (वैध असल्यास) विक्री परवाना, जीएसटी नोंदणी, पर्यावरणीय मंजुरी परवाना, अग्निसुरक्षा परवाना, लिफ्ट लायसन्स साइनेज परवाना, संगीत परवाना, दुकान आणि स्थापना परवाना, रेस्टॉरंट विमा आदी परवाने आवश्यक आहेत.
अन्न प्रशासनातर्फे कारवाई शून्य जिल्ह्यातील ढाब्यांमधील नमुन्यांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जात नाही. यामुळे ढाब्यांमध्ये अवैध प्रकार चालतो. केवळ भोजनच नाही तर दारूचीही विक्री केली जाते. अशा ढाब्यांवर कारवाईची गरज आहे.
अन्न प्रशासनात मनुष्यबळाचा अभाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असतानाही केवळ एका अधिकाऱ्याच्या भरवशावर संपूर्ण जिल्ह्याचा कारभार सुरू आहे.