लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनावर शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्याच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून बहिष्कार टाकला. या बहिष्काराला आश्रमशाळा कर्मचाऱ्यांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्वच आश्रमशाळांमध्ये हे आंदोलन करण्यात आले.
सध्या आश्रमशाळेची वेळ सकाळी ८:४५ ते दुपारी ४ अशी आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदर वेळ अत्यंत अडचणीची व गैरसोयीची ठरत आहे. आदिवासी विकास विभागाने अत्यंत आडमुठेपणाचे धोरण अवलंबून सदर वेळ कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या माथी मारलेली आहे.
शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करावी यासाठी 'सीटू' संघटनेच्या वतीने यापूर्वी वेळोवेळी सनदशीर मार्गाने शासनास व प्रशासनास लेखी निवेदन, प्रत्यक्ष भेटीद्वारे अवगत केले. सदर प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे २३ ऑगस्ट २०२३ व २२ जुलै २०२४ रोजी १० हजारांहून अधिक शिक्षकांनी राज्यभरातून सहभाग घेऊन दोनदा भरपावसात धरणे आंदोलन केले होते, हे उल्लेखनीय आहे.
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन नाशिक आयुक्तालय अंतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर हे चार विभाग आहेत. शासनाने आश्रमशाळेची शालेय वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्याच्या मागणीची गंभीरतेने दखल न घेतल्याने ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बहिष्कार आंदोलन आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे तसेच नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, राज्य व विभागीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक शिक्षकांनी केले.
९५ शाळांमध्ये आंदोलनराज्यात शासकीय ५९६ तर अनुदानित ५५६ असे एकूण ११५२ आश्रमशाळा आहेत. यामध्ये अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर विभाग अंतर्गत ७६ शासकीय तर १३२ अनुदानित आश्रमशाळा आहेत. राज्यभरात हे बहिष्कार आंदोलन झाले. जिल्ह्यातील शासकीय तसेच अनुदानित अशा एकूण ९५ आश्रमशाळांमध्ये आंदोलन करण्यात आले.
अभिवादन केले, अध्यापन बंद माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आश्रमशाळांमध्ये साजरी करण्यात आली. दरम्यान, डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले; परंतु शिक्षकांनी वर्गामध्ये अध्यापन केले नाही.