आयुक्तांचे पत्र : आलापल्ली मसाहत मार्कंडा (कं) ग्रा.पं.त दाखलआष्टी : आष्टी ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेला आलापल्ली मसाहत हा भाग मार्कंडा (कं.) ग्रामपंचायतमध्ये गेल्याने आष्टी ग्रामपंचायतीचा लाखो रूपयांचा महसूल कमी झाला आहे. आलापल्ली मसाहत हा भाग २००२ साली आष्टी ग्रामपंचायतीमध्ये जोडण्यात आला होता. या भागाला आष्टी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा, नाली बांधकाम, विद्युत खांब उभारणे, रस्त्यांची दुरूस्ती आदी कामे करून दिली होती. या मसाहतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला करसुध्दा उपलब्ध होत होता. या वसाहतीमधील वडलकोंडावार या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून आलापल्ली मसाहत हा भाग महसूल खात्याच्या दप्तरी मार्र्कंडा (कं) गावाच्या क्षेत्रात येत असल्याने सदर आलापल्ली मसाहत मार्र्कंडा (कं.) या ग्रामपंचायतीमध्ये जोडण्याची मागणी करण्यात आली होती. ही तक्रार आयुक्तांकडे पाठविण्यात आली आहे. आयुक्तांनी मार्र्कंडा (कं.) ग्रामपंचायतीला पत्र पाठवून या भागातील कर वसूल मार्र्कंडा ग्रामपंचायतीने करावे, असे निर्देश दिले आहेत. या मसाहतीमध्ये ग्रामीण रूग्णालय, पाणी पुरवठा योजनेची टाकी, हायस्कूल, वरिष्ठ महाविद्यालय व जवळपास ६०० लोकवस्ती आहे. आलापल्ली मसाहतीला आष्टी ग्रामपंचायतीनेच सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना तीन किमी अंतरावर असलेल्या मार्र्कंडा (कं.) येथे जावे लागणार आहे. त्यामुळे ही वसाहत आष्टी ग्रामपंचायतीमध्ये राहावी, यासाठी आता आष्टी येथील नागरिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आलापल्ली मसाहतील सोयीसुविधा पुरविण्यासाठी आष्टी ग्रामपंचायतीचे लाखो रूपये खर्च झाले. उत्पन्न मात्र आता मार्र्कंडा ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने आष्टी ग्रा.पं.फटका बसणार आहे. (प्रतिनिधी)
आष्टी ग्रामपंचायतीला बसला लाखोंचा फटका
By admin | Published: February 09, 2016 1:02 AM