आष्टी : चामोर्शी तालुक्यातील इल्लूरपासून-चपराळा देवस्थान नाक्यापर्यंत गेल्या दीड महिन्यापासून डांबरीकरण सुरू आहे; परंतु कामात दिरंगाई हाेत आहे. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर करावे, अशी मागणी चपराळा देवस्थान कमिटीने केली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. यासाठी ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर गिट्टी, माती टाकून रोलर फिरविला जात आहे. ११ मार्चला महाशिवरात्रीनिमित्त चपराळा येथे यात्रा भरणार आहे. या मार्गाने ठाकरी, कुनघाडा (माल), रामनगट्टा, इल्लूर येथील नागरिक दररोज ये-जा करतात. रस्त्याच्या कामांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.