गडचिराेली : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आरमाेरी तालुक्यातील वैरागड येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी गुप्तधन आहे, असा अनेकांचा समज असल्याने यापूर्वी अनेकदा खोदकाम झाल्याचे प्रकार घडले आहेत. असाच प्रकार पाच-सहा दिवसांपूर्वी घडला आहे. किल्ल्याच्या पूर्व दिशेला खंदकाच्या बाजूला दोन खड्डे केले आहेत. त्यातील एक खड्डा बुजवला आहे. सदर खोदकाम गुप्तधनाच्या लालसेपोटी केले असावे, कारण त्या ठिकाणी पूजा अर्चा केल्याचे साहित्य पडले आहे. हा कजलीचा प्रकार असून कष्ट करण्याची तयारी नसणाऱ्या काही व्यक्ती असा गोरखधंदा करतात, अशी नागरिकांत चर्चा आहे.
साेळाव्या शतकात वैरागड येथे नागवंशी राजा कुरुमप्रहोद यांची सत्ता होती. हिऱ्याच्या खाणीच्या संरक्षणासाठी किल्ला बांधला हाेता. या ठिकाणी सैन्याचा तळ असायचा. पुढे चंद्रपूरचा राजा बल्लाळशाने काही काळ राज्य केले. त्यादरम्यान अनेकदा मुसलमान राज्याचा सेनापती युसुफखान यांनी वैरागडवर स्वाऱ्या केल्या. मोगल सैन्य धनसंपत्ती लुटून नेत. म्हणून आपल्याजवळ असलेले धन तांब्याची नाणी, दुर्मीळ मूर्ती तत्कालीन लोक जमिनीत पुरून ठेवत. वैरागडला तांब्याची नाणी, दुर्मीळ देव-देवीच्या मूर्ती खोदकामात अनेकदा मिळाल्यात. पण, गुप्तधन सिद्धीने मिळवता येते त्याला कोणताही आधार नाही. पण, वैरागड आणि परिसरात असे प्रयोग केले जातात. यातून काही मांत्रिक निर्माण झाले आहेत. हे मांत्रिक काही नागरिकांची साथ पकडतात. त्यांच्याकडून पूजेच्या सामानासाठी किंवा इतर गाेष्टींसाठी खर्च वसूल करतात. यातून काही मिळत नसले तरी मांत्रिकाचे मात्र पाेट भरते.
१९८८ मध्ये कापला हाेता बकरा
किल्ल्याच्या मागील प्रवेशद्वाराजवळ चिंचेचे झाड होते. त्या ठिकाणी एक मोठा खड्डा होता. गुप्तधनाच्या शोधासाठी सन १९८८ मध्ये त्या ठिकाणी पूजा-अर्चा करून बोकड कापून त्या बोकडाचे डोके ठेवण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार लोकांच्या खूप चर्चेत होता. त्यानंतर चार-पाच वर्षांपूर्वी किल्ल्याच्या अंतर्भागात दोन-तीन ठिकाणी खोदकाम केले होते. वैरागड येथे गुप्तधन असण्याच्या अफेमुळे किल्ल्याच्या अवतीभवती खोदकाम करून गुप्तधन मिळवण्याचे अनेकदा अपयशी प्रयत्न केले जातात.
गुप्तधनासाठी किल्ल्याजवळ खोदलेला खड्डा
विदर्भातील सप्तधामांपैकी वैरागडचे भंडारेश्वर मंदिर आहे. साेळाव्या शतकात राजा बल्लाळशाची भावसून राणी हिराईदेवीने आपल्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावाच्या दक्षिणेला एका उंच टेकडीवर भंडेश्वराचे मंदिर बांधले. राणी हिराईदेवी मोठी दानशूर होती. पूर्वीच्या काळी एखादे देवालय जागृत असावे यासाठी मंदिर गाभाऱ्यात असणाऱ्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करताना धनद्रव्य अर्पण केले जात असे. हा सगळा संदर्भ लक्षात घेऊन नोव्हेंबर १९९९ मध्ये काही समाजकंटक आणि भंडारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात असणारे शिवलिंग गुप्तधनासाठी खोदले होते. नंतर गावकऱ्यांनी विधिवत प्रतिष्ठापना केली.