लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नागरिकांना २४ तासात कधीही पैसे काढण्याची सुविधा देणाऱ्या आणि त्यासाठी लाखो रुपये साठवून ठेवलेल्या एटीएमची सुरक्षा गडचिरोली शहरात ‘रामभरोसे’ सुरू आहे. खासगी बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक राहात असले तरी राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएमची दारे रात्री-अपरात्री कोणत्याही सुरक्षा रक्षकाविना सताड उघडी राहात असल्याची बाब ‘लोकमत’च्या पाहणीत निदर्शनास आली. त्यामुळे लाखो रुपयांची रोकड राहणाºया एटीएमच्या सुरक्षेबाबत संबंधित बँका एवढ्या बिनधास्त कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.अलिकडे अनेक ठिकाणी चोरट्यांनी एटीएम मशिनच चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील विविध बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घेतली जात आहे याची पाहणी लोकमत चमुने मंगळवारी रात्री १२.१५ ते १ वाजतादरम्यान केली. यात खासगी बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक दिसून आले पण बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम कोणत्याही सुरक्षा रक्षकाविना सताड उघडे असल्याचे दिसून आले.पैशाची आवश्यकता कोणाला कधी पडेल याचा नेम नसतो. बँक खातेदारांना आपल्या खात्यातील पैसे कुठूनही आणि केव्हाही काढता यावे यासाठीच २४ तास सेवा देणारे एटीएम केंद्र अनेक बँकांनी सुरू केले आहेत. पण नागरिकांना ही सेवा देताना त्या एटीएमची सुरक्षाही तेवढीच महत्वाची असते. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भरोशावर लाखो रुपयांचे एटीएम सोडून बिनधास्तपणे राहणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.कोणत्या ठिकाणच्या एटीएम मध्ये २४ तास गार्डची गरज आहे हे राष्ट्रीयकृत बँकांमधील आयटी सेलचे अधिकारी ठरवितात. त्यानुसार संबंधित सुरक्षा एजन्सीला तशी सूचना करून त्यासाठी अतिरिक्त मोबदला दिला जातो. एटीएमच्या सुरक्षेसंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक शाखा किंवा अग्रणी बँकेलाही नाही.- सुरेश भोसले, व्यवस्थापक, अग्रणी बँक, गडचिरोलीखासगी बँका सुरक्षेच्या बाबतीत सतर्कशहरात असलेल्या आयसीआयसीआय, अॅक्सिस या खासगी बँकेसह युनियन बँकेच्या एटीएम मध्ये रात्री १२.४५ वाजतादरम्यान सुरक्षा गार्ड होते. थंडीपासून बचावासाठी ते आवश्यक ते गरम कपडे घालून आतमध्ये खुर्चीवर बसून होते. दोन ठिकाणच्या एटीएम मधील गार्ड मोबाईल पाहण्यात व्यस्त होते. पण बाहेर कोणीतरी आल्याची चाहुल लागताच ते सावध झाले. आळीपाळीने २४ तास सदर एटीएममध्ये गार्ड राहात असल्याचे त्यांनी सांगितले.बंदुकधारी गार्डच नाहीगडचिरोलीत ज्या एटीएममध्ये गार्ड होते त्यांच्यापैकी कोणाकडेही बंदूकीसारखे शस्त्र नव्हते. अॅक्सिस आणि आयसीआयसीआय या बँकांच्या एटीएमची सुरक्षा ‘एमएसएफ’ या एजन्सीकडे तर युनियन बँकेची सुरक्षा रेडिअंट या एजन्सीकडे आहे. पण नक्षलग्रस्त जिल्ह्यात एटीएमच्या सुरक्षेसाठी बंदुकधारी गार्डची गरज वाटू नये हेसुद्धा नवलच आहे. लुटमार करण्यासाठी येणाºया लोकांचा एक नि:शस्त्र गार्ड प्रतिकार करू शकेल का? याचा विचार करून बँकांनी भविष्यात योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.सीसीटीव्ही कॅमेरे कितपत उपयोगाचे?बहुतांश सर्वच बँकांच्या एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले दिसले. परंतू गार्ड न ठेवता केवळ सीसीटीव्ही कॅमेºयांच्या भरोशावर लाखो रुपयांची रक्कम ठेवणे योग्य ठरत नाही. अलिकडे सीसीटीव्ही कॅमेºयासमोर विशिष्ट स्प्रे मारून त्या कॅमेºयांची दृष्टि धुसर करण्याचे प्रकारही घडले आहेत. असे असताना एटीएम चोरटे त्या कॅमेºयांमध्ये टिपले जातीलच याचीही शाश्वती राहिलेली नाही.कुणीही या, काहीही करागडचिरोली शहरात चंद्रपूर मार्ग, चामोर्शी मार्ग आणि धानोरा मार्गावर बहुतांश एटीएम आहेत. चंद्रपूर मार्गावर बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्टÑ या दोन्ही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुरक्षा रक्षक आढळले नाही. याशिवाय चामोर्शी मार्गावरील याच दोन बँकांच्या एटीएम मध्ये कोणीही सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसून आले. पोस्ट आॅफिस आणि स्टेट बँकेच्या एटीएम मध्येही कधीच सुरक्षा रक्षक दिसत नाही. मंगळवारी रात्री या दोन्ही बँकांच्या एटीएमचे शटर लावून होते. रात्रीच्या वेळी राहण्यासाठी सुरक्षा रक्षक नाही म्हणून ते दरवाजे बंद होते की अजून दुसरे कोणते कारण हे कळू शकले नाही.
गडचिरोलीतील राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 6:00 AM
अलिकडे अनेक ठिकाणी चोरट्यांनी एटीएम मशिनच चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील विविध बँकांच्या एटीएमच्या सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घेतली जात आहे याची पाहणी लोकमत चमुने मंगळवारी रात्री १२.१५ ते १ वाजतादरम्यान केली. यात खासगी बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक दिसून आले पण बहुतांश राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम कोणत्याही सुरक्षा रक्षकाविना सताड उघडे असल्याचे दिसून आले.
ठळक मुद्देसुरक्षा गार्ड बेपत्ता : मशीन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरही अनेक बँका बेदखल