गोठणगावात आर्थिक साक्षरता अभियान : डीसीसी बँक व नाबार्डचा उपक्रम कुरखेडा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने तालुक्याच्या गोठणगाव येथे गुरूवारी डिजिटल आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी २५० बँक खातेदारांच्या बचत खात्याशी त्यांचे आधार क्रमांक संलग्नित करून ते अपडेट करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरखेडाचे संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे होते. तर मार्गदर्शक म्हणून नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक क्रिष्णा कोल्हे तर प्रमुख अतिथी म्हणून गोठणगावच्या सरपंच संगीता मारगाये, पंचायत विस्तार अधिकारी राजेश फाये, पारधी, मने, ग्रा. पं. सदस्य संजय नाकतोडे, हिराजी माकडे, पोलीस पाटील गोवर्धन नेवारे, आदिवासी विकास महामंडळाचे निरीक्षक धावणे, विनायक चौधरी, धनुष मंगर, स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक चौधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकास विभागाचे एस. डी. साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हा विकास व्यवस्थापक क्रिष्णा कोल्हे म्हणाले, बँक व्यवहारात आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान आत्मसात करून बँकिंग व्यवहारात रोख रकमेचा वापर टाळता आला पाहिजे. बँक ग्राहकांनी रोखरहित व्यवहारावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गोठणगावातील सर्व बँक ग्राहकांनी आपल्या बचत खात्याशी आधारकार्ड क्रमांक संलग्नित करावे, कारण संलग्नित करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने बँक ग्राहकांनी व गावातील सर्व नागरिकांनी प्रयत्न करावा, असे कोल्हे यावेळी म्हणाले. याप्रसंगी ‘आधारकार्ड क्रमांकाचे महत्त्व : बँकेच्या बचत खात्याशी आधारकार्ड क्रमांक संलग्न करणे’ याविषयावर चित्रफितीद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक उल्हास महाजन यांनी प्रास्ताविकेतून बँकेत उपलब्ध असलेल्या आधुनिक सोयीसुविधा तसेच बँकेमार्फत विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित ग्राहकांना दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मुन्ना धोंगळे यांनी केले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी, गावातील बँक खातेदार तसेच महिला बचतगटाच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे यांनीही केंद्र शासनाने सुरू केलेल्या कॅशलेस व्यवहार व अभियानाची माहिती दिली. कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढवून कमी वेळात अधिकाधिक काम उरकवून घेण्याचे आवाहन मरस्कोल्हे यांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)
२५० बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्नित
By admin | Published: January 07, 2017 1:28 AM