गडचिरोली : गावाजवळच्या जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली. विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात वाघ किंवा बिबट्याचे अस्तित्व आणि हल्ल्याची घटना घडली नव्हती.
मलय्या बालय्या दुर्गम (वय ५०, रा. पेंटीपाक) असे मृत गुराख्याचे नाव आहे. मलय्या याच्यासह मृतेश पोचमा रामनेनी (वय ४८) हा देखील गुरे घेऊन गेला होता. दोघे एकामेकांपासून काही अंतरावर होते. याचवेळी झुडपातून आलेला एक बिबट्या कळपातील वासरावर झडप घेत असताना मलय्याला दिसला. तो वासराला वाचविण्यासाठी काठी घेऊन पुढे सरसावला, तितक्यात बिबट्याने वासराऐवजी मलय्यावर झडप घेतली व त्याला १०० मीटर अंतरावर फरफटत नेले. यामुळे जखमी झालेल्या मलय्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बिबट्याने पुन्हा वासरावर हल्ला केला पण इतर गुरांमुळे बिबट्या वासराला मारू शकला नाही.
सिरोंचा तालुक्यात जवळपास ५० वर्षांपूर्वी पेंटीपाका याच गावातील सुदुला मोंडी पोचम या व्यक्तीचा पट्टेदार वाघाशी मुकाबला झाला होता. त्यावेळी ३० वर्षीय सुदुलाने वाघाला हरवून पळवून लावले होते. तेव्हापासून सुदुलाला सर्वत्र 'शेरखान' या टोपणनावाने ओळखले जाते. आज या घटनेमुळे ८० वर्षाच्या शेरखानसह अनेकांनी त्या आठवणींना उजाळा दिला.