चामोर्शी : प्राथमिक शिक्षक समिती चामोर्शीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या ३६ समस्यांना घेऊन पंचायत समितीसमोर सोमवारी आमरण उपोषण प्रारंभ केले होते. या उपोषणाला खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी भेट देऊन शिक्षकांच्या समस्या एक महिन्यात सोडविण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.चामोर्शी पंचायत समितीसमोर सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या ३६ समस्यांबाबत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणाला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी भेट दिली. शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व १५-१५ दिवसांच्या टप्प्याने आढावा सभा घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असे ठोस आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्ते संघटनेचे राजेश बाळराजे, सरचिटणीस संजय लोणारे, कार्याध्यक्ष अनिल बारई यांना लिंबूशरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी पं. स. च्या सभापती शशी चिळंगे, उपसभापती केशव भांडेकर, पं. स. सदस्य रेवनाथ कुसराम, स्वप्नील वरघंटे, प्रमोद पिपरे, रामेश्वर सोलुकर, रवी बोनवार, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकांच्या समस्येवर आमदार, खासदार घालणार लक्ष
By admin | Published: November 18, 2014 10:56 PM