लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी एक दिवसीय पॅकेज टूरचा प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटकांची संख्या वाढून जिल्ह्याची नवी ओळख समोर येणार आहे.दि.१ ते ७ आॅक्टोबर या वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभागाने मंगळवारी पत्रकारांना जिल्ह्यातील वनपर्यटनाला वाव असणाºया ठिकाणांवर नेऊन तेथील माहिती दिली. या जिल्ह्याची ओळख आतापर्यंत केवळ एक नक्षलग्रस्त जिल्हा अशी असली तरी प्रत्यक्षात वनसंपदेने नटलेल्या या जिल्ह्यात आदिवासी संस्कृतीचा वास वर्षानुवर्षे आहे. याशिवाय मोठे वनवैभव आणि विविध जिवाष्मांसह शेकरूसारखे दुर्मिळ प्राणी या जिल्ह्यात आहेत. परंतू त्यांची माहितीच नसल्यामुळे वनपर्यटक त्यापासून मुकतात. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या पुढाकाराने या वनसंपदेची ओळख पत्रकारांना करून देण्यात आली. आलापल्ली वनविभागांतर्गत येणाºया घोट येथे १२ हेक्टरमध्ये वसुंधरा जैवविविधता वनउद्यान तयार करण्यात आले आहे. यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर तनपुरे यांनी माहिती देताना सांगितले की, या वनउद्यानात १९ दुर्मिळ प्रजातींची २३९ झाडे आहेत. छोटा तलाव आहे. विविध फुलझाडे आणि औषधीयुक्त वनस्पती आहेत. नक्षत्र वन, छोटा तलाव आणि परिसर न्याहाळण्यासाठी मनोरे (टॉवर) उभारले आहेत. पण दोन वर्षांपासून निधी नसल्यामुळे काही कामे प्रलंबित आहेत.चामोर्शी तालुक्यात रायपूर येथे राज्यात दुर्मिळ असलेला शेकरू हा प्राणी आढळलो. खारूताईसारखाच दिसणारा पण आकाराने मोठा असलेला हा प्राणी एका झाडावरून दुसºया झाडावर उडत जातो आणि झाडावरच घरटी करून राहतो. रायपूरच्या शेकरू पार्कमधील झाडांवर आढळणारे हे शेकरूसुद्धा एक आकर्षण आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अशा रेगडी जलाशयाच्या परिसरात बोटींग सुरू केले जाणार आहे. जिल्ह्यातील अशा विविध ठिकाणांवर पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी गडचिरोली ते गडचिरोली असा एक दिवसाचा पॅकेज टूर तयार केला जाऊ शकतो. त्यात आदिवासी नृत्य, त्यांच्या संस्कृतीची ओळख, आदिवासी गावही पर्यटकांना दाखविले जाऊ शकते, असे आरएफओ तनपुरे यांनी सांगितले. त्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव दिला आहे.२५ चे झाले १५० गिधाडनिसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले गिधाड दुर्मिळ होत आहे. पण गावकºयांच्या सहकार्याने गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. त्यासाठी ढोरफोडीच्या ठिकाणी गिधाड रेस्टॉरेंट तयार करून त्यांना खाद्य मिळण्याची व्यवस्था केली आहे. गावकºयांना त्यासाठी प्रोत्साहन म्हणून मृत ढोरासाठी, गिधाडांची माहिती देण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जाते. परिणामी आज गिधाडांची संख्या २५ वरून १५० वर पोहोचल्याची माहिती नोडल आॅफिसर पी.ओ.चौधरी यांनी दिली.
जिल्ह्याचे वनवैभव ठरू शकते पर्यटकांसाठी आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:13 AM
वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनपर्यटनाला चालना देण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देएक दिवसीय पॅकेज टूरचा प्रस्ताव : वनउद्यान, आदिवासी संस्कृतीसह शेकरू पार्कचा आनंद