गडचिरोली : चामोर्शी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या धामधुमीत ठाण्यात बोलावून अतुल गण्यारपवार यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अतुल गण्यारपवार हे चामोर्शीतील बडे राजकीय प्रस्थ आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची २० एप्रिल ही अंतिम तारीख होती. त्याच पहाटे पोलिस ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्या व बुटाने मारहाण केल्याचा आरोप गण्यारपवार यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवेंवर केला होता. मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले होते.
दरम्यान, पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यासह बडतर्फीच्या कारवाईसाठी चामोर्शीत आंदोलन झाले होते. अतुल गण्यारपवार यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद न झाल्याने त्यांनी ॲड.ठाकरे यांच्यामार्फत चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेतली. ॲड. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड.केदार यांनी गण्यारपवार यांच्या वतीने बाजू मांडली. त्यानंतर २० मे रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम २९४, ३२४, ३२६ ३४२ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. ९ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान,चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अतुल गण्यारपवार यांच्या पॅनलने मुसंडी मारली. अतुल गण्यारपवारांच्याच गळ्यात सभापतीपदाची माळ पडली आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष वेधले होते.
सत्य परेशान हो सकता है...
न्यायालयाने पो.नि. राजेश खांडवेंवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यावर चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही', अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. खाकी वर्दीच्या जोरावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यास ही मोठी चपराक आहे. कोणावर पोलिस अधिकारी हात उचलत असेल, मारहाण करत असेल तर अशा पध्दतीने न्यायालयात जाऊन दाद मागता येते, हा संदेश या प्रकरणातून मिळाल्याचे ते म्हणाले. आपला न्यायदेवतेवर विश्वास असून ही लढाई पुढेही लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हा नोंद होणार का..?
दरम्यान, चामोर्शी ठाण्याचा कारभार पो.नि. राजेश खांडवे यांच्याकडेच आहे. न्यायालयीन आदेशानुसार ते स्वत:विरुध्द गुन्हा नोंद करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. तथापि, खात्रीशीर सूत्रांनुसार, प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाविरुध्द पोलिस प्रशासन सत्र न्यायालयात दाद मागणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु असल्याची माहिती आहे.