तेंदू युनिटच्या विक्रीतील गौडबंगाल : भामरागड तालुक्यातील दुर्गम गावातील प्रकार गडचिरोली : अनुसूचित क्षेत्रातील पेसाअंतर्गत तेंदूपाने लिलाव प्रक्रिया ग्रामसभा व ग्रामपंचायती यांच्या मार्फत राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मर्जीतील ठेकेदारांना कमी दरात हे युनिट विक्री करून उर्वरित रक्कम आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दुर्गम व अतिदुर्गम भागात ग्रामसभांचे पदाधिकारी तसेच ग्रामसेवक पुढाकार घेत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडू लागले आहे. त्यामुळे तेंदू युनिट लिलावाच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या जात असल्याचे दिसून येत आहे. भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम ग्राम पंचायतअंतर्गत ग्रा. पं. मडवेली, ग्रा. पं. येचली, ग्रा. पं. पल्ली यांनी २०१७ च्या तेंदूपाने युनिट लिलाव संदर्भात १४ मार्च २०१७ ला ग्रामसभा घेण्याचे ठरविले होते. पं. स. भामरागडमधील कोणताही अधिकारी उपस्थित न झाल्याने व कोरम पूर्ण न झाल्याने लिलाव पुढे ढकलला १६ मार्च रोजी हा लिलाव घेण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र मन्नेराजारामचा लिलाव रद्द झाला. अद्यापही हा लिलाव झालेला नाही. येथे एका ठेकेदाराने काही लोकांना पैसे देऊन सभेचा कोरम पूर्ण होऊ दिला नाही. दोनवेळा सभा रद्द झाली. आता परस्पर १३ हजार ५०० रूपयाला लिलाव असाच करून टाकल्याचा गंभीर प्रकार येथे घडला आहे. त्यामुळे तेंदू संकलनाचे काम करणाऱ्या मजुरांचेही बोनसमध्ये नुकसान होणार आहे. ग्राम पंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने शासनाने ग्रामपंचायतींना तेंदू युनिट विक्रीचे अधिकार दिले असले तरी छत्तीसगड, तेलंगणा व आंधप्रदेशातील अनेक ठेकेदार अहेरी उपविभागात काही राजकीय लोकांना मॅनेज करून ग्राम पंचायतीच्या ग्रामसभा न होताच हे युनिट हडप करण्याच्या मागे लागले आहे. त्यामुळे वारंवार ग्रामसभा रद्द केल्या जात आहे. या प्रकारामुळे ग्रामसभांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी) १४ मार्चला पं. स. सभापती पदाच्या निवडणुका होत्या. त्यामुळे आपण लिलाव प्रक्रियेला उपस्थित राहू शकलो नाही. त्यानंतर ग्रामस्थ, कंत्राटदार व ग्रामसेवक यांनी १६ मार्चला लिलावाची तारीख निश्चित केली होती. मात्र ग्रामसभांचे काही पदाधिकारी त्या दिवशी उपस्थित झाले नसल्याची माहिती ग्रामसेवकांनी आपल्याला दिली आहे. येथील लिलाव प्रक्रिया अद्याप पार पडल्याचा अहवाल आपल्यापर्यंत आलेला नाही. आपण केवळ पेसा अंतर्गत ग्राम पंचायतीच्या कामात मध्यस्त म्हणून काम करीत आहो. पूर्णत: अधिकार ग्रामसभांचे आहे. तेंदू युनिट विक्री अद्याप झाली असल्याची बाब आपल्याला माहित नाही. - फरेंद्र कुतीरकर, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, भामरागड ग्रामसेवकांची हजेरीच अनियमित एटापल्ली, मुलचेरा तालुक्यात अनेक ग्रामसेवकांकडे एक ते दोन ग्राम पंचायतीचा प्रभार आहे. त्यामुळे ते १५ दिवसातून एकवेळा त्या गावात जातात. ग्रामसेवकच नियमित नाही. ग्राम पंचायतीत ग्रामसेवक हजर होत नसल्याने तेंदू लिलाव प्रक्रियेवरही याचा विपरित परिणाम होत आहे.
लिलाव ढकलले जात आहेत पुढे
By admin | Published: March 30, 2017 2:01 AM