कारवाईचे संकेत : ६६७ मंडळांची पाठगडचिरोली : सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी चोरीची वीज न घेता रितसर अर्ज करून अधिकृतरित्या तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, यासाठी महावितरणच्या वतीने गणेश मंडळांना घरगुतीपेक्षा कमी वीज दर आकारण्यात आले. वीज दरात सवलत देऊनही गडचिरोली जिल्ह्यात अधिकृत वीज जोडणी घेण्याकडे बहुतांश मंडळांनी पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील एकूण ६८५ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी केवळ १८ मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली आहे. त्यामुळे उर्वरित मंडळांवर महावितरणतर्फे कारवाईचे संकेत आहेत.५ सप्टेंबर सोमवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. त्यापूर्वीच महावितरणच्या वतीने २४ आॅगस्टला सार्वजनिक मंडळांनी सवलतीच्या दरात अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. या बाबत सूचना शांतता समितीच्या बैठकीत देण्यात आली. मात्र महावितरणच्या अधिकृत वीज जोडणीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा एकूण ६८५ सार्वजनिक गणेश मूर्तींची मंडळांतर्फे प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. यामध्ये ४९३ सार्वजनिक व १९२ गावांमध्ये एक गाव, एक गणपतीची संकल्पना साकारण्यात आली आहे. एकूण ६८५ सार्वजनिक मंडळांपैकी केवळ १८ मंडळांनी अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेतली आहे. यामध्ये गडचिरोली उपविभागातील तीन व आलापल्ली उपविभागातील १५ सार्वजनिक मंडळांचा समावेश आहे. उर्वरित ६६७ गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणीकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे. गणेशोत्सवासोबतच गणेश विसर्जनाच्या काळात विजेचा वापर प्रचंड प्रमाणात होतो. अधिकृत वीज जोडणी घेतली नसल्याने जीवित व वित्त हानीचा धोका नाकारता येत नाही. (स्थानिक प्रतिनिधी)स्वतंत्र पथकाकडून होणार चौकशीसार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी चोरीची वीज न वापरता अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घेऊन सुरक्षितरित्या विद्युतीकरण करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेतली नाही. याबाबतची चौकशी करण्यासाठी महावितरणच्या वतीने स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले आहे. सदर पथक आता गावागावात जाऊन चौकशी करणार आहे. मंडळावर कारवाई होते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१८ मंडळांकडे अधिकृत वीज
By admin | Published: September 11, 2016 1:26 AM