खासदारांचे प्रतिपादन : एटापल्लीत महिला मुक्ती मेळावा; पोलीस स्टेशनचा उपक्रम एटापल्ली : भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी शासकीय योजनांचे अनुदान बँक खात्यामध्येच जमा करण्याचे धोरण केंद्र व राज्य शासनाने अवलंबिले आहे. शासकीय योजनांचा लाभ घेताना गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत:चे बँक खाते जनधनच्या माध्यमातून उघडावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. एटापल्ली येथे रमाई बहुउद्देशीय विकास संस्था, पोलीस स्टेशन एटापल्ली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमान महिला मुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते बोलत होते. मेळाव्याला उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, सीआरपीएफचे महिला वेलफेअर पुनम त्रिपाठी, कमांडंट प्रभाकर त्रिपाठी, सहायक कमांडंट आशुतोष सिंहनीकुंभ, पं.स. सभापती दीपक फुलसंगे, ठाणेदार शिवाजी राऊत, नगरसेवक रमेश टिकले, तान्या दुर्वा, ज्ञानेश्वर रामटेके, विजय नल्लावार, प्रा. खोडे, कन्नाके आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम केले. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांकरिता अनेक योजना आखल्या आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान जीवनगट्टा येथील महालक्ष्मी बचतगट यांना दिल्लीत पुरस्कार मिळाल्याबद्दल बचत गटाची अध्यक्ष वंदना गावडे व बचत गटाच्या इतर सदस्यांचा खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गडचिरोली येथील विज्ञान प्रदर्शनीत एटापल्ली येथील राजमाता राजकुंवरबाई विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी प्रिती कोका आत्राम या विद्यार्थिनीच्या सोलरबल्ब प्रकल्प या मॉडेलला जिल्ह्यातून प्रथम बक्षिस मिळाले. तिचाही सत्कार करण्यात आला. सीआरपीएफच्या वतीने नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध वितरण करण्यात आले. विद्यार्थिनी व महिलांनी नृत्य सादर केले. प्रास्ताविक सुनिता चांदेकर, संचालन शिक्षीका वंदना आर्इंचवार तर आभार वैशाली सोनटक्के यांनी मानले. यशस्वीतेसाठी किरण करमकर, सुग्रा खोब्रागडे, लिला दुर्गे, शेवंता राहूलकर, किरण दहेगावकर, बेबी दुर्गे, अनिता कांबळे, रजना झाडे, सुवर्णा फुलमाळी, करूणा मुरारशेट्टीवार, गीता दासरवार यांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने एटापल्ली, जीवनगट्टा व परिसरातील महिला उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)
अडचण टाळण्यासाठी बँक खाते उघडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2017 1:32 AM