आरमोरीतील स्थिती : उन्हाळी धान पीक निघण्याच्या मार्गावर लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : तालुक्यात जवळपास ५०० हेक्टरवर उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. सदर धान निघताच शेतकरी या धानाची विक्री करतो. मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने उन्हाळी धानाचे धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. धान पिकविणे जेवढे कठीण आहे. त्यापेक्षा त्यांची जोपासना करून विकणे कठीण झाले आहे. हमी धान केंद्र शासनाचे असले तरी केंद्र चालकांना शासनाने अद्याप धान खरेदी करण्याचे आदेश दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी धान विक्रीसाठी पायपीट करून खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागणार असल्याची शक्यता आहे. उन्हाळी धान कापणीच्या हंगामाचा श्रीगणेशा होत आहे. तर अनेक ठिकाणी धानपिक कापण्यात आलेले आहे. उन्हाच्या तिव्रतेमुळे कापणी व मळणीचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यानंतर धान विक्रीला बाजारात उपलब्ध होतील. मात्र, नेहमीप्रमाणेच अनेक अडचणींचा सामना करीत धान कुठे ठेवायचे, अवकाळी पावसाच्या भितीने आच्छादन कसे करावे, मागणी किती दिवसांनी होईल, हमाल मोजणी व्यवस्थित करतील का, हमालीचा दर किती असेल, धान चोरीला जातील काय, मोजणीत इलेक्ट्रीक काटा असेल काय, मोजणीवेळी प्रतीकट्टा किती किलो धान अधिक नेतील, मोजणीनंतर मोबदला किती दिवसात मिळेल, बोनस मिळेल काय? अशा एक ना अनेक समस्यांनी धान उत्पादक शेतकरी विवंचनेत सापडला आहे. धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी यापूर्वीही शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षीप्रमाणे उशीर झाल्यास शेतकऱ्यांचा तोटा होण्याची शक्यता आहे.
धान केंद्रांची प्रतीक्षा
By admin | Published: May 08, 2017 1:46 AM