नाली उपशाचे काम ढेपाळले
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय, शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने हे अतिक्रमण काढावे, अशी मागणी आहे.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले, परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत.
पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारल्या जाते. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे.
किमती १० टक्क्यांनी वाढल्या.
सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करा
सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावापर्यंत अद्यापही पोहोचली नाही.
औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.
कुरखेडातील गावांना लाइनमनच नाही
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावात राइसमिल, आटाचक्की, सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो, परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते, तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.
आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसूती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांना प्रसूतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
पन्न्या टाकणाऱ्यांवर कारवाई नाही
देसाईगंज : नगरपालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लॅस्टिक पन्न्यांचा वापर करतात. येथील राजेंद्र वॉर्ड, माता वॉर्ड व गांधी वॉर्डातील अनेक जण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लॅस्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात. नाल्यांमध्ये प्लॅस्टिक व पन्न्या टाकल्या जात असल्याने सांडपाणी निचरा हाेण्याचा मार्ग बंद झाला आहे. कारवाईची नितांत गरज आहे.
चामोर्शीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा
चामोर्शी : शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट डुकरांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आहे. कचरा, तसेच सांडपाण्याच्या डबक्यांमध्ये मोकाट डुकरे बसून असतात. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. या डुकरांपासून बालकांना धोका आहे. त्यामुळे मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
भामरागड तालुक्यातील पर्यटनस्थळ दुर्लक्षित
भामरागड : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटनस्थळे आहेत. भामरागड तालुक्यातील बिनागुंडासह अन्य पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही.