गडचिराेली : २१ मार्च राेजी रविवारला जागतिक वनदिन हाेता. वनविभागाच्या वतीने पाचही वनविभागात विविध उपक्रम घेऊन वन तसेच पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनाचा जागर करण्यात आला.
गडचिराेली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डाॅ.किशाेर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वन दिनानिमित्त जिल्हाभरात विविध उपक्रम घेण्यात आला.
वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी वनाधिकाऱ्यांना ठिकठिकाणी विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पाचही वन विभागात विविध कार्यक्रम व उपक्रम राबवून जागतिक वन दिन साजरा करण्यात आला.
गडचिरोली वनसंरक्षक कार्यालयात वन संवर्धनाबाबत वनवसाहत मध्ये असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वनसंवर्धनाचे महत्व विषद करण्यात आले. आणि त्यानंतर इयत्ता ५ वी ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा कार्यक्रम राबवून वनसंवर्धन करण्यासाठी शपथ देण्यात आली. जिल्हाभरात ठिकठिकाणी वन कर्मचाऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढून वन संवर्धनाविषयी जनजागृती केली. जागतिक वन दिना निमित्त वन विभागाच्या गाड्यांवर प्रचार, प्रसार करण्यासाठी फलक व बॅनर लावून प्रसिद्धी करण्यात आली.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव असल्याने सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोनाच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. यावेळी गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिराेली वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ.कुमार स्वामी, आलापल्लीचे उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे, भामरागडचे उपवनसंरक्षक आशिष पांडे, सिराेंचाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार व वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक विवरेकर या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व वन कार्यालयांमध्ये वन दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
याशिवाय उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पशु पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली. वन आणि वन्यजीवाचे महत्व कळावे यासाठी गडचिरोली वनविभागातील गुरवळा उपवनक्षेत्रात विद्यार्थ्यांसोबत वनभ्रमंती आयोजित करण्यात आली.
जागतिक वनदिना निमित्त वनाचे संवर्धन करण्यासाठी जिल्हाभरात सर्व वनाधिकाऱ्यांनी, वनकर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून जनजागृती करून मोलाचा सहभाग नोंदवून गाव खेड्यात संदेश देण्यात आलेला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत सर्व वन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बाॅक्स...
नुकसानीचेे धनादेेश, गॅस व राेप वाटप
गुरवळा उपवन क्षेेत्रातील शेतकऱ्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पीक नुकसानीचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच सेमाना उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना विविध जातींच्या राेपट्यांचे वितरण करण्यात आले. गडचिराेली वनविभागातर्फे गुरवळा उपवनक्षेत्रात स्थानिक लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना वनविभागाच्या याेजनांची माहिती देण्यात आली. वनसंवर्धनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बाॅक्स...
वन व्यवस्थापन समित्यांना केले मार्गदर्शन
वन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वनविभागाचे अद्ययावत नियम, विद्यमान सरकारकडून अवलंबिण्यात येणारे धाेरण आदी बाबतची माहिती संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. जंगलातील वणवे राेखण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांनी सतर्क राहावे, वेळीच माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.