जनजागृती रॅली काढण्यापूर्वी आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी परिक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय व कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वनांचे संरक्षण करण्याची शपथ दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालयातून जनजागृती रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मोटारसायकलने काढण्यात आलेली रॅली आरमोरी परिक्षेत्रातील आरमोरी, रामाळा, ठाणेगाव परिसरात पोहाेचून वन व वन्यप्राणी यांचे संरक्षण व संवर्धन करणे, वनाला आग लावू नये, मोहा झाडाखालची जागा साफ करून पाला पाचोळा जाळून मोहा फुले गोळा करावी, मोहा झाडाखाली लावण्यात आलेली आग वन क्षेत्रात पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. पुढे तेंदू हंगामाची सुरूवात होत आहे. त्यावेळी खुट कटाई करताना कंत्राटदारांचे एजंट जंगलात आग लावून पसार होतात, असे कृत्य करताना कुणीही इसम आढळल्यास त्याची माहिती तत्काळ नजीकच्या वन कर्मचाऱ्याला द्यावी, वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी वन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. रॅलीत महिला वनरक्षक प्रिया करकाडे, रूपा सहारे यांच्यासह सर्व वनरक्षक - वनपाल, वनमजूर, कार्यालयीन कर्मचारी आदींनी भाग घेतला. पळसगावचे क्षेत्रसहायक एम. जी. शेख यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी आरमोरीचे क्षेत्रसहायक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक वासुदेव दोनाडकर यांनी सहकार्य केले.
जागतिक वन दिनानिमित्त मोटारसायकलद्वारे जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:33 AM