गडचिरोली : शहरातील अनेक वॉर्डांत टिल्लूपंप लावून अवैधरीत्या पाणी ओढले जात आहे. परिणामी अनेक वॉर्डांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नळांना केवळ पाच ते सहा गुंड पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. नळाला पाणी आल्यानंतर अनेक नागरिक छुप्या पद्धतीने लावलेला टिल्लूपंप सुरू करतात.
डास निमूर्लनासाठी धुरळणी करा
धानोरा : अनेक वर्षांपासून धुरळणी झाली नाही. डासांच्या वाढणाऱ्या पैदाशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुरळणी करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे. मात्र नगरपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालय सक्ती करा
आलापल्ली : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश वीज कर्मचारी मुख्यालयी न राहता गडचिरोली, चामोर्शी येथे राहून ये-जा करतात. रात्रीच्या सुमारास बिघाड निर्माण झाल्यास हा बिघाड दुरुस्त करणे शक्य होत नाही.
वाहनांच्या वेगमर्यादेवर नियंत्रण ठेवा
चामोर्शी : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवितात. अशा वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनेक गावे विहिरीच्या पाण्यावर अवलंबून
अहेरी : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. एकूण लोकसंख्येच्या केवळ १९.५० लोकसंख्याच नळाचे पाणी पिण्यासाठी वापरते. उर्वरित जनतेला विहीर, हातपंपाच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीमार्फत नियमितपणे विहीर व हातपंपामध्ये ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही. त्यामुळे सदर पाणी पिण्यायोग्य राहत नसल्याचे आढळून आले आहे.
भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे; परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली, आदी गावे येतात.
अंकिसात स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
अंकिसा : शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर यासाठी जनजागृती केली जात आहे. परंतु अंकिसा येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला सर्वत्र प्लास्टिक, कचरा, काचेच्या बाटल्या व अन्य कचरा दिसून येतो.