लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विश्वगुरु होते. त्यांनी दीन, दलित, शोषित, पीडितांसाठीच नव्हे तर देश कल्याणासाठी सर्व व्यापकतने कार्य केले आहे. ओ.बी.सी.ची जनगणना होण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता.परंतु ही मागणी मान्य न झाल्याने त्यांनी कायदामंत्री पदाचा त्याग केला व जनआंदोलन केले. त्यांचे कार्य कुणा एकासाठी नव्हते समग्र देशासाठी होते. त्यांचे विचार आजही अंगीकारल्यास देशाचे कल्याण होईल असे प्रतिपादन आ. मनाेहर चंद्रिकापुरे यांनी केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ एप्रिल १९५४ रोजी देसाईगंज येथे उपस्थित राहून असंख्य लोकांना मार्गदर्शन केले होते. त्या दिवसाची आठवण म्हणून दीक्षाभूमी व्यवस्थापनाच्या माध्यमातून सम्यक जागृत बौद्ध महिला समितीतर्फे पदस्पर्श दिनाचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. समारंभाचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष जेसा मोटवानी, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय मेश्राम, प्राचार्य अनिल थूल, चंदु राऊत, नंदु नरोटे, पिंकू बावणे, सुखदेव दहिवले, ए.आर.बिडवाईक, मारोती जांभुळकर, ईलियास पठाण, नरेश वासनिक, आंबेडकरी विचारवंत जीवन बागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. देसाईगंज येथील पदस्पर्श भूमी-दीक्षाभूमी ही वंचिताचे श्रद्धास्थान आहे. येथे माथा टेकवल्याने पराकोटीचे समाधान लाभते. त्यामुळे या भूमीशी माझे हृदयापासून संबंध असल्याने या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे भाष्य आ. कृष्णा गजबे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीच्या उपाध्यक्षा शामला राऊत,संचालन डाकराम धोंगळे तर समितीच्या सहसचिव जयश्री लांजेवार यांनी केले.यशस्वीतेकरिता इंजि. विजय मेश्रामसह समितीच्या महिला व सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी कार्य केले.
चंदू राऊत यांनी केली एक महिन्याची पेन्शन दान - दरम्यान सामाजिक कार्यकर्ते चंदु राऊत यांनी वर्षातील एक महिन्याची पेन्शन दीक्षाभूमी विकासासाठी नियमित दान देणार असल्याची घोषणा केली.यापूर्वी त्यांनी ग्रास कटर मशीन दान केल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. - दुपारी ३.०० वाजता सर्वधर्मीय वर-वधू परिचय मेळावा व सायंकाळी सप्तखंजेरी वादक डाॅ.पवन दवंडे यांचा सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.