कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील सिरोंचा-अहेरी या मार्गाला जोडणाऱ्या टेकडा-कंबलपेठा या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. टेकडा (ताला) परिसरातील शेकडो नागरिक याच मार्गाने सिरोंचा व अहेरी तालुका मुख्यालयी ये-जा करतात. मात्र वर्दळीच्या असलेल्या या मार्गाची पूर्णत: वाट लागल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्याही कामामुळे संपर्क येत असतो. जाफ्राबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी कर्मचाऱ्यांची कमतरता व सुविधांचा अभाव असल्याने सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात बरेच रुग्ण हलविले जातात. रुग्ण व प्रवाशी सुरळीत पोहोचण्यासाठी मार्ग चांगला असणे गरजेचे आहे. आधुनिक काळात दळणवळणाची सोय अत्यंत महत्त्वाची आहे. गावागावाला जोडणारे रस्ते पक्क्या स्वरूपाचे झाल्याशिवाय या भागाचा विकास शक्य नाही.टेकडा-कंबालपेठा हा मार्ग सिरोंचा ते अहेरी या ११५ क्रमांकाच्या राज्य महामार्गाला जोडणारा महामार्ग आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. टेकडा येथून सिरोंचाला जाण्यासाठी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यात पाणी साचून राहत असल्यामुळे वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे.मागील सात-आठ दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात संततधार पाऊस होत आहे. त्यामुळे टेकडा ते कंबालपेठादरम्यान असलेल्या अटीवागू नाल्यावरील अर्धा पूल वाहून गेला आहे. त्यामुळे आवागमनास अडचण निर्माण झाली आहे. सदर पुलावरील स्लॅब वाहून गेल्याने या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांनी श्रमदान करून माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात या पुलाची दुरूस्ती केली. यंत्रणेने सदर पुलाची व या पुलाला जोडणाºया टेकडा-कंबालपेठा मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कंबालपेठा मार्गाची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 5:00 AM
टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्याही कामामुळे संपर्क येत असतो.
ठळक मुद्देवाहनधारक हैराण : खड्डेमय मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीची मागणी