कोरची : कोरची-भीमपूर या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असल्याने या मार्गाने आवागमन करताना नागरिकांना त्रास होत आहे. येथे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सदर मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोरची ते भीमपूर या ५ किमी मार्गावर सर्वाधिक खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे या मार्गाची अनेकदा डागडुजी करण्यात आली. परंतु डागडुजीनंतर अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था होऊन ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित करीत आहेत.
कोरची येथून छत्तीसगडला जाण्यासाठी छोटी वाहने तसेच जड वाहनांची दिवस-रात्र याच मार्गाने वाहतूक असते. विशेष म्हणजे रस्त्याची दुरुस्ती करताना अनेकदा केवळ मुरुम किंवा बारीक गिट्टी टाकली जाते. डांबराचा आवश्यक प्रमाणात वापर होत नाही. अल्पावधीतच रस्त्याची दुरवस्था होऊन स्थिती ‘जैसे थे’ होते.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीने नियमित ये-जा करणाऱ्या लोकांना कंबर दु:खीचा त्रास जाणवत आहे. या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.