गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक ही जनावरे खात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा यामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या गंभीर प्रकाराबाबत नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. बऱ्याच दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाच्यावतीने प्लास्टिक जप्ती माेहीम राबविण्यात आली हाेती. दुकानदारांकडून दंडही वसूल करण्यात आला हाेता.
धाेकादायक जीर्ण शाळा इमारती कायमच
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात जिल्हा परिषदेमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या अनेक जुन्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. पावसामुळे या जीर्ण इमारती कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. सतत मागणी करूनही जीर्ण इमारती निर्लेखित केलेल्या नाहीत. याबाबत ठाेस निर्णय घेण्याची गरज आहे, अन्यथा या जीर्ण इमारती काेसळल्याशिवाय राहणार नाहीत.
वैयक्तिक शौचालयांची गावांमध्ये कमतरता
गडचिराेली : अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आदी दुर्गम तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये वैयक्तिक शौचालये फारच कमी प्रमाणात आहेत. जिल्ह्यात १०० टक्के शौचालय असणारे एकही गाव नाही. यामुळे गोदरीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे आजारांत वाढ होत आहे. ग्रामीण नागरिक मुख्य रस्त्यावरच शौचाला बसतात.
खुल्या जागा ठरताहेत कुचकामी
देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक प्रभागांमध्ये ओपन स्पेस आहेत; मात्र काही मोजक्याच ओपन स्पेसला संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या ओपन स्पेसला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. नगरपालिकेने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गाेकुलनगरात प्रलंबित कामे वाढली
गडचिरोली : गडचिराेली शहराचा सर्वात मागास भाग म्हणून ओळख असलेल्या गाेकुलनगर प्रभागात रस्ते, नाले, वीज, पथदिवे आदी मूलभूत समस्या कायम आहेत. माता मंदिर परिसरात बरीच विकासकामे गेल्या दीड वर्षापासून मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, काेराेना प्रादुर्भाव आणि इतर कारणांमुळे विकासकामे थांबली आहेत.
शहरातील नाल्यांमध्ये फवारणीची मागणी
सिरोंचा : येथील अनेक प्रभागांमध्ये डासांमुळे आजाराचे प्रमाण वाढले असून, अनेक घरी लोक तापाने फणफणत आहेत. सर्दी, पडसे यासह अन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे नाल्यांचा उपसा करून सर्वच प्रभागांमधील नाल्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
चामोर्शीत बांधकाम साहित्य रस्त्यावर
चामाेर्शी : शहरातील विविध भागात घरांचे बांधकाम सुरू असून, बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटविण्याची मागणी नागरिकांकडून हाेत आहे. नगर पंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.