वैरागड-देलनवाडी या मुख्य मार्गापासून थोड्या अंतरावर सुकाळा फाट्यापासून पुढे जाणाऱ्या रस्त्यावर २५ हेक्टर क्षेत्रात हे मिश्र रोपवन पसरले आहे. तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी खुरटे जंगल होते. तेथे पर्यायी वनीकरण योजनेतून ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत २७ हजारपेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात आली. सध्यास्थितीत या रोपवणातील सगळीच रोपे जिवंत असून तीन वर्षातच अपेक्षित वाढ झाली आहे. तीन वर्षांपूर्वी तयार हाेऊन चांगल्या स्थितीत असलेले वडसा वन विभागातील हे पहिले रोपण असावे. वैरागड उपवन क्षेत्रातील रोप वनात वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी व मजूर संवर्धनासाठी परिश्रम घेत आहेत.
या रोपवणात गौण वनाेपज आवळा, बेहडा, मोह, कडूनिंब रोप वनाची घनता वाढविण्यासाठी बांबूचे रोप मोठ्या प्रमाणात लावण्यात आले. येत्या काही दिवसात हे रोपवन वन्यजीव आणि वनसंवर्धनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मागील काही वर्षात वन विभागाने जे रोपवन तयार केले, त्यातील बहुतांश राेपवन सध्या अस्तित्त्वात नाही. परंतु तीन वर्षांपूर्वी लागवड केलेले राेपवन सुस्थितीत आहे. या राेपवनाची निगा याेग्यप्रकारे राखली जात आहे.