लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सिंधीच्या झाडाचा रस काढण्यासाठी फांद्या तोडल्या जातात. त्याचबरोबर खिळ्याच्या मदतीने छिद्र पाडून त्यामध्ये नळी टाकली जात असल्याने काही वर्षातच झाड करपते. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीच्या झाडाचा रस काढण्यास बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान ग्रामसभेसमोर आहे.वैरागड परिसरातील मेंढा, वडेगाव, कुरंडीमाल, येंगाडा, पिसेवडधा, सुकाळा, मोहझरी या गावांमधील शेतांमध्ये, बोडी, तलावाच्या पाळीवर तसेच जंगलात मोठ्या प्रमाणात सिंधीची झाडे आहेत. सिंधीच्या झाडाची पूर्णपणे वाढ होण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेली शेकडो झाडे वैरागड परिसरात आहेत. त्यामुळे येथील सिंधीची झाडे वैरागड परिसरासाठी भुषणावह बाब ठरली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून हिवाळाच्या कालावधीत सिंधीच्या झाडाचा रस काढण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यासाठी बाहेरगावचे नागरिक येतात. ते शेतमालकाला काही पैसे देतात. मात्र रस काढण्याची पद्धत अतिशय चुकीची आहे. यामुळे झाडाला बाधा निर्माण होत असल्याने त्यावर कारवाई करण्याचे अधिकार वन विभागाला सुध्दा आहेत. परंतू वनविभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सिंधीचा रस काढण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.सिंधीच्या झाडाचे रस काढताना फांद्या तोडल्या जातात. तसेच खिळा ठोकून झाडाला जखम केली जाते. नळी टाकून रस काढला जात असल्याने त्या झाडाचे जीवनसत्व संपून झाडाच्या वरचा पालवीचा बुंदा कोसळून सदर झाड काही वर्षातच करपत जात आहेत. वैरागड परिसरातील गावांमधील शेकडो सिंधीची झाडे करपली आहेत. लोकमतने याबाबत मार्च २०१८ मध्ये वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीचा रस काढण्यावर बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे. मात्र या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. सिंधी काढण्यासाठी दुसऱ्या गावातील व्यावसायिक दाखल झाले आहेत.रसात मिसळविली जातात घातक रसायनेसिंधीच्या रसामध्ये घातक रसायने मिसळविली जातात. या रसाची तपासणी करून संबंधित विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करू शकतात. तसेच सिंधीच्या रसामुळे नशा येत असल्याने पोलीस विभाग सुध्दा संबंधित विक्रेत्यावर कारवाई करू शकते. मात्र या दोन्ही विभागांसह वनविभागही चूप असून वैरागडसह जिल्हाभरात खुलेआम सिंधीच्या रसाची विक्री केली जात आहे.
सिंधीचा रस काढण्यास वैरागड येथे बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:48 AM
सिंधीच्या झाडाचा रस काढण्यासाठी फांद्या तोडल्या जातात. त्याचबरोबर खिळ्याच्या मदतीने छिद्र पाडून त्यामध्ये नळी टाकली जात असल्याने काही वर्षातच झाड करपते. ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यानंतर वैरागड ग्रामसभेने सिंधीच्या झाडाचा रस काढण्यास बंदी घालण्याचा ठराव घेतला आहे.
ठळक मुद्देवैरागड ग्रामसभेत ठराव : अल्पावधीतच झाड होते नष्ट, कारवाईचे आव्हान