कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केले. आजाराची लागण होऊन दुर्दैवाने निधन झाल्यास या फ्रंटलाईन वर्करांना आर्थिक मदत दिल्याची उदाहरणे आहेत पण सतत बँक खातेदाराबरोबर संपर्क ठेवून त्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत पार पाडणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना शासनाच्या अशा कोणत्याही सुविधा नाहीत. ग्राहकांचे आर्थिक व्यवहार, बँक खाते सुरू करणे, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, परतफेडीसाठी प्रसंगी ग्राहकांच्या दारापर्यंत जाणे या सगळ्या व्यवहारादरम्यान बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ग्राहकांबरोबर प्रत्यक्ष संबंध येतो आणि संचारबंदीच्या दरम्यान बँकेत मोठी गर्दी असायची आणि गर्दी झाली तर संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाते. कोरोना संकटकाळात नेहमीच कर्तव्य बजावणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्याप्रमाणे बँकेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना फ्रंन्टलाइन कोरोना योद्धा घोषित करावे आणि दरम्यान संसर्ग किंवा मृत्यू झाल्यास इतराप्रमाणे शासनाने सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
कोट
सरकारच्या विविध योजना बँकेमार्फत सध्या सुरू आहेत त्यासाठी बँकेत खातेदारांची मोठी गर्दी होते. याचा विचार करुन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये इतके प्रोत्साहनपर मानधन दिले आहे.
पद्माकर शेबे,
शाखा व्यवस्थापक, मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, वैरागड.