आरमोरी: राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्रमांक २ चे कर्ज बिनव्याजी असताना व सदर योजनेचे व्याज शासन भरणार असतानाही या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या कर्जावर बँक ऑफ इंडिया शाखेकडून व्याजाची आकारणी करून लाभार्थ्यांना शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास दिल्या जात आहे तसेच बँकेकडून वसुलीचा तगादा लावल्या जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांकडून केली जाणारी व्याजाची वसुली तत्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी आरमोरी येथील लक्ष्मीनारायण आंबटवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेवरील परंतु अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाचे घरकूलचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्य शासनाने २००७-०८ मध्ये राजीव गांधी ग्रामीण निवारा क्रमांक २ ही योजना अंमलात आणली. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना १० हजार लाभार्थी हिस्सा व ९० हजार रुपये बँकांकडून बिनव्याजी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत होते. सदर बिनव्याजी कर्जाची रक्कम १० वर्षात लाभार्थ्यांनी टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा देण्यात आली होती. बँकेकडून मिळालेल्या कर्जावर व्याजाची रक्कम प्रकल्प संचालक ग्रामीण विकास योजना यांचेमार्फत शासन भरणार होते. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेकडून बिनव्याजी कर्ज घेऊन घरकूलचे स्वप्न पूर्ण केले.
आरमोरी येथील लक्ष्मीनारायण आंबटवार यांनीही बँक ऑफ इंडियाकडून एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज घेतले. शासनाचे नियमानुसार त्यांनी नियमित कर्जाच्या रकमेचा नियमित भरणा केला व ३ ऑक्टोबर २०२० प्रयत्न संपूर्ण कर्जाची परतफेड केली. मात्र शाखा व्यवस्थापकांनी कर्जावर ६६ हजार ९८४ रुपये व्याजाची आकारणी करून व्याजाची वसुली करण्याकरिता लाभार्थ्यांकडे बँकेने तगादा लावला जात आहे. याबाबत बँक ऑफ इंडिया आरमोरीच्या शाखा व्यवस्थापकांना विचारले असता शासनाकडून लाभार्थ्यांना दिलेल्या कर्जावरील व्याज भरण्यात आले नसल्याने लाभार्थ्यावर कर्जाच्या व्याजाची आकारणी करण्यात आली आहे, असे सांगितले.