आॅनलाईन लोकमतगडचिरोली : पश्चिम बंगाल राज्यात झालेल्या नक्षलबरी येथील लढाईला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त जनतेने २३ ते २९ मे या कालावधीत नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन बॅनरच्या माध्यमातून केले आहे. तर आदिवासी बचाव समितीच्या नावाने जिमलगट्टा परिसरात बॅनर बांधण्यात येऊन नक्षल्यांनी आदिवासींची लूट केली असल्याचा आरोप केला आहे. एकंदरीतच नक्षल सप्ताहाच्या निमित्ताने ग्रामीण भागात बॅनर युध्द पेटले असल्याचे दिसून येत आहे. नक्षल्यांनी २३ मेच्या रात्री एटापल्ली पासून अगदी तीन किमी अंतरावर असलेल्या जीवनगट्टा व डोली मार्गावर बॅनर बांधले आहेत. या लाल रंगाच्या बॅनरवर नक्षलबरीच्या लढाईच्या लढाईला ५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्त आनंदोस्तव साजरा करावा, नक्षल चळवळीचे संस्थापक चारू मुजूमदार यांना लाल सलाम, साम्राज्यवाद व नोकरशाहीवादापासून सावध राहा, असा संदेश देण्यात आला आहे. २३ मे च्याच रात्री आदिवासी बचाव समितीच्या नावाने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरात बॅनर टाकले आहे. यामध्ये नक्षल्यांनी निरपराध नागरिकांची हत्या करणे बंद करावे, आदिवासींच्या नावावर खंडणी वसुली बंद करावी, नक्षल्यांद्वारे बंद पाळण्याच्या आवाहनाचा धिक्कार करावा, असे आवाहन केले आहे. दोन्ही बाजुने आवाहन करणारी बॅनर व नक्षल पत्रके ग्रामीण भागात टाकण्यात आली असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्षलग्रस्त भागात पेटले बॅनर युध्द
By admin | Published: May 23, 2017 5:14 PM