कोरची/एटापल्ली (गडचिरोली) : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी रविवारी नक्षलवाद्यांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्यानिमित्त कोरची तालुकास्तरावरील बाजारपेठ कडकडीत बंद होती. तसेच एटापल्ली-आलापल्ली मार्गावर नक्षलवाद्यांनी बॅनर बांधले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२ डिसेंबरपासून पीएलजीए सप्ताहाला सुरूवात झाली. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी एटापल्ली तालुक्यातील दोन नागरिकांची हत्या करून नक्षलवाद्यांनी आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर पोलीस सतर्क होऊन नक्षलविरोधी अभियान तीव्र केल्याने सप्ताहादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी पुन्हा आपले वर्चस्व दाखविण्यासाठी रविवारच्या रात्री ठिकठिकाणी बॅनर बांधले तसेच पत्रके टाकुन शेवटच्या दिवशी बंद पाळण्याचे आवाहन केले. मार्गावर लाकडे टाकून मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. नक्षल्यांच्या या आवाहनाचा प्रभाव दुर्गम भागातील गावांमध्ये दिसून आला. यामुळे काही भागात बंद पाळण्यात आला. बॅनर व पत्रकातून केंद्र शासनाच्या धोरणांवर टिका करण्यात आली आहे. पीएलजीए सप्ताहाला सुरूवात होण्यापूर्वी पोलिसांनी कोरची येथील व्यापाºयांची बैठक घेऊन संपूर्ण सप्ताहभर बाजारपेठ सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार बाजारपेठ सुरू होती. मात्र अचानक रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. ही बाब पोलिसांना माहीत होताच त्यांनी काही दुकाने सुरू करायला लावली. तरीही काही वेळातच ही दुकाने बंद करण्यात आली. दिवसभर कोरचीतील बाजारपेठ कडकडीत बंद होती. तसेच खासगी वाहनेही बंद ठेवण्यात आली होती.