कव्हरेज गूल बीएसएनएलचा कारभार : ग्राहक त्रस्त
जिमलगट्टा : जिमलगट्टा येथील दूरभाष केंद्रातील इनव्हटरच्या बॅटर्या निकामी झाल्या आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होताच सेकंदाच्या आत मोबाईलचा कव्हरेज गूल होऊन जाते. या प्रकारामुळे ग्राहक प्रचंड त्रस्त झाले आहेत. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा हे महत्वाचे गाव आहेत. येथे दुरभाष केंद्र आहे. मागील सहा वर्षांपासून दूरभाष केंद्रातील इनव्हटरच्या बॅटर्या बदलविण्यात आल्या नाही. येथे जनरेटर उपलब्ध आहे. परंतु डिझेलचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने त्याचा वापर कधीच केला जात नाही. जनरेटर सुरू करण्यासाठी बॅटर्याच वापरतात. आता बॅटर्यासुध्दा निकामी झाल्या आहेत. त्यामुळे डिझेल व बॅटरीच्या अभावी जनरेटर धुळखात पडून आहे. याबाबत जिल्हा अभियंता दूरसंचार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी १५ दिवस अगोदर गडचिरोलीवरून जुन्या बॅटर्यांचा संच पाठविला. परंतु त्या बॅटर्या निकामी आहेत. त्यानंतर दुरूस्तीसाठी चमूही आली होती. त्यांनी थातूरमातूर दुरूस्ती केली. दोन-चार दिवस सुरळीत काम चालले. त्यानंतर परत विद्युत पुरवठा खंडीत होताच कव्हरेज गूल होण्याचा प्रकार सुरू झाला. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या दूरभाष केंद्रावर परिसरातील बर्याच गावाचे कव्हरेज अवलंबून आहेत. परंतु या प्रकाराकडे दूरसंचार खात्याचे दुर्लक्ष आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. (वार्ताहर)