लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून, मतदारांना पैसे व दारूचे प्रलोभन मिळू नये, परजिल्ह्यातून दारू व रोकडची ने-आण होऊ नये, यासाठी जिल्हा सीमेवर वैनगंगा नदी तीरावर चंद्रपूर मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, या ठिकाणी आवागमन करणाऱ्या प्रत्येक चारचाकी व दुचाकी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दुचाकी वाहनचालकांचीही झाडाझडती घेतली जात आहे.
गडचिरोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली, शहर तालुक्यासह धानोरा व चामोर्शी तालुक्यात आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.
सध्या दिवाळी आणि भाऊबीज सणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गर्दीचा फायदा घेत काही दारू तस्कर दारूचा पुरवठा, तर काही कार्यकर्ते पैशांची ने आण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानुषंगाने निवडणूक विभाग व पोलिस विभाग अलर्ट झाला आहे.