लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : साखरगाठीची निर्मिती करण्यासाठी साखर, जाडा दोरा, दूध पावडर, टिनोपॉल व हायड्रोपॉवर यासारख्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे साखरगाठीचे अतिसेवन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने साखरगाठीच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.होळीच्या सणानिमित्त लहान मुलांना साखरगाठी भेट देण्याची परंपरा विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात आहे. प्रत्येक नातेवाईक व शेजारी साखरगाठी देत असल्याने मोठ्या प्रमाणात साखरगाठ्या जमा होतात. बऱ्याच मुलांना गोड पदार्थ आवडत असल्याने साखरगाठ्यांची मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. साखरगाठी ही कडक राहत असल्याने लहान मुलाला ती चावत नाही. त्यामुळे लहान मुल साखरगाठी चोखतात. खेळत असतानाच गाठी चोखली जात असल्याने बऱ्याचवेळा धूळ व मातीसोबत संपर्क येतो. बऱ्याचवेळा गाठीवर माशाही बसतात व त्याच गाठीचे सेवन लहान मुले करतात. गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे हगवन लागण्याची शक्यता अधिक राहते.गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश गाठ्या नागपूर येथून आणल्या जातात. नागपूर येथे साखरगाठ्या निर्मितीचे अनेक गृह उद्योग आहेत. साखरगाठी आकर्षक दिसावी. ती लवकर बनावी यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. सदर साखरगाठी आरोग्यास धोकादायक आहे.
साखरगाठ्यांचे भाव स्थिरयावर्षी गडचिरोली शहरात साखरगाठ्या ३० रूपये पाव व १०० रूपये किलो या दराने विकल्या जात आहेत. मागील वर्षी सुध्दा हाच दर होता. गडचिरोली शहरात विविध ठिकाणी साखरगाठ्या विक्रीची दुकाने लागली आहेत.
१५ दिवसानंतर गुढीपाडव्याचा सण येतो. नवीन वर्ष आनंदी जावे यासाठी साखरगाठ्यांचा प्रसाद करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर गुढीच्या सभोवताल साखरगाठी बांधण्याची परंपरा आहे. त्यामुळे गुढीपाडव्यापर्यंत साखरगाठी जपून ठेवली जाते.साखरगाठ्यांचे अतिसेवन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे साखरगाठ्यांच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे. मुलांना जास्त साखरगाठ्या खाण्यासाठी देऊ नये. अतिसेवनामुळे हगवण लहान मुलांना लागण्याची शक्यता राहते.- संतोष कांबळे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली