लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : जगाला प्रज्ञा, शिल आणि करुणेची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे समाजाचे प्रेरणास्त्रोत आहेत. २९ एप्रिल १९५४ रोजी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीवर असलेल्या वास्तुचे नुतनीकरण, परिसराचे सुशोभिकरण, स्वच्छतागृहाचे बांधकाम या कामांचा शुभारंभ करताना मला अत्यानंद होत आहे. परंतु समाजाने बाबासाहेबांचे विचार जगताना बुध्दांच्याही तत्वांशी सुसंगत रहावे, असे विचार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.देसाईगंज येथील दीक्षाभूमी परिसराच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ गुरूवारी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष शालुताई दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, नगर परिषद गटनेते किसन नागदेवे, प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, महिला समिती अध्यक्ष कविता मेश्राम, उपाध्यक्ष शामला राऊत, सचिव ममता जांभूळकर, पंढरी गजभीये, श्रावण बोदेले, नगरसेवक गणवीर, राहूल अन्वीकर, अनिरूद्ध वनकर, भंते बुद्धशरण,गोंदिया पंचायत समितीचे सभापती ढेंगे, राजू जेजाणी, सहाय्यक आयुक्त विनोद मोहतूरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून शासनाने बहूप्रतिक्षीत असलेल्या या दीक्षाभूमी परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ५४ लाख २० हजार रुपये मंजूर झाले. कामाचा शुभारंभ होत आहे. कामाचा दर्जा, सौंदर्यीकरण उत्तमरित्या होईल याची बांधकाम विभागाने कटाक्षाने लक्ष घालावे. याच दिक्षा भुमीवर पाच कोटी रुपयांची एक विशाल वास्तु उभी राहावी याकरीता प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले. या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात येईल असेही आश्वासन यावेळी बडोले यांनी दिले. या भूमीचा विकास झाला पाहिजे अशी माझी इच्छा होती आणि आज ती फलद्रृप झाली. संपुर्ण राज्यात अशा ऐतिहासिक वास्तुच्या, स्थळाच्या विकासासाठी मोठया प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला आहे. सर्व स्मारके वाचनालये व्हावीत. युवकांच्या ठिकाणी ज्ञानाचा भांडार तयार होऊन आपला देश सर्वांगिण विकसीत व्हावा याकरीता वाचनालयाची अत्यंत आवश्यकता आहे असे ते म्हणाले.पालकमंत्री आत्राम आपल्या भाषणात म्हणाले, बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाची घटना आपल्या देशाला दिली. या संविधानामुळेच लोकशाही सुदृढ होऊन देश सुजलाम सुफलाम होईल. बाबासाहेबांचे विचार सदैव प्रेरणादायी राहणार आहेत. सामाजिक न्याय विभागाने या दीक्षाभुमीवर एक विशाल वास्तु तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा असे ते म्हणाले. जगातील शालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधान समाविष्ट केलेला आहे. यावर सातत्याने आकलन केले जाते, असे पालकमंत्री आत्राम म्हणाले.याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्षा दंडवते, किसन नागदेवे आदींची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या पदाधिकारी यांनी सहकार्य केले.प्रास्ताविक अभियंता प्रकाश बुब, संचालन प्रकल्प समन्वयक बादल श्रीरामे तर आभार विनोद मोहतुरे यांनी मानले.
बुद्धांच्या तत्त्वांशी सुसंगत रहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 11:46 PM
जगाला प्रज्ञा, शिल आणि करुणेची शिकवण देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे समाजाचे प्रेरणास्त्रोत आहेत. २९ एप्रिल १९५४ रोजी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीवर असलेल्या वास्तुचे नुतनीकरण, परिसराचे सुशोभिकरण, स्वच्छतागृहाचे बांधकाम या कामांचा शुभारंभ करताना मला अत्यानंद होत आहे.
ठळक मुद्देराजकुमार बडोले यांचे प्रतिपादन : दीक्षाभूमी परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन